भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने थरारक विजय मिळवला आहे. भारतीय संघाने अवघ्या ६ धावांनी विजय मिळवत इंग्लंडला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत होते. अखेरच्या दिवशी भारताने ४ विकेट्स घेत इंग्लंडला ३५ धावाही करू दिल्या नाही. पाचव्या कसोटी सामन्यात नेमकं काय घडलं, १० महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये समजून घेऊया.

नाणेफेक

इंग्लंडने या कसोटी मालिकेत पाचही सामन्यांची नाणेफेक जिंकली. भारताला एकाही सामन्याची नाणेफक जिंकण्यात यश आलं नाही. पाचव्या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं.

पहिल्या डावात करूण नायरचं महत्त्वपूर्व अर्धशतक

पहिल्या डावात भारताने २२४ धावा केल्या. भारताचे सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार गिलदेखील मोठी खेळी करू शकला नाही. यानंतर साई सुदर्शन ३८ धावा केल्या. पण करूण नायरने १०९ चेंडूत ८ चौकारांसह ५७ धावा केल्या आहेत. करूण नायरच्या या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने २०० धावांचा पल्ला गाठला.

इंग्लंडचा पलटवार पण भारताचे गोलंदाज भिडले

भारताने पहिल्या डावात २२४ धावा केल्यानंतर इंग्लंडने २४७ धावा केल्या. इंग्लंडच्या सलामी जोडीने आक्रमक सुरूवात करत वेगाने धावा केल्या. पण तिसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. सिराज आणि प्रसिध यांनी संघाला १-१ विकेट मिळवून दिली.

भारताने उभारला धावांचा डोंगर

भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत मोठी धावसंख्या उभारली. भारताच्या सर्वच फलंदाजांनी या धावसंख्येमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. यशस्वी जैस्वालचं शतक आणि वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाची अर्धशतकं महत्त्वपूर्ण ठरली.

यशस्वी जैस्वालचं शतक आणि आकाशदीपसह भागीदारी

यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात इंग्लंडला त्यांच्यात बॅझबॉल शैलीची झलक दाखवली. यशस्वीने ‘जॅसबॉल’ दाखवत आक्रमक फलंदाजी केली आणि शतकं झळकावत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यशस्वी जैस्वालने १६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांसह ११८ धावा केल्या. याशिवाय नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपने अनपेक्षित खेळी करत इंग्लंडला चकित केलं. आकाशदीपने ९४ चेंडूत १२ चौकारांसह ६६ धावा करत जैस्वालसह १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

जडेजा वॉशिंग्टनची अर्धशतकं

यशस्वी जैस्वाल आणि आकाशदीपच्या फटकेबाजीनंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडचा समाचार घेतला. जडेजाने ७७ चेंडूत ४ चौकारांसह ५३ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने टी-२० शैलीत फटकेबाजी करत ४६ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.

ब्रूकचं पहिल्या डावात अर्धशतक

भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण यामध्ये इंग्लडने १०६ धावांवर ३ विकेट्स गमावले होते. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जो रूटने १९५ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयात मोठा अडथळा ठरले. ब्रूकने ९८ चेंडूत १४ चौकारांसह २ षटकारांसह १११ धावांची खेळी केली. तर जो रूटने ३९वं शतक करत १५२ चेंडूत १० चौकारांसह १०५ धावांची खेळी केली.

मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी

मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. सिराजने या सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या डावात सिराजने ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात त्याने ५ विकेट्स घेत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. भारताला या सामन्यात विजयासाठी ४ विकेट्सची गरज असताना सिराजने अखेरच्या दिवशी भेदक गोलंदाजी करत ३ विकेट्स घेत भारताच्या विजयाचा हिरो ठरला.

मोहम्मद सिराजचा प्रसिधची चांगली साथ

मोहम्मद सिराजला या सामन्यात प्रसिध कृष्णाने चांगली साथ दिली. त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स घेत इंग्लंडचा डाव आटोपण्यात मोलाचं योगदान दिलं. यानंतर त्याने दुसऱ्या डावात शतकवीर जो रूटला माघारी धाडत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. तर अखेरच्या दिवशी जोश टंगला क्लीन बोल्ड केलं.