Mohammed Siraj Broke Jasprit Bumrah Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीत मोहम्मद सिराजने उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडच्या मोठ्या फलंदाजांची शिकार केली. सिराजने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. प्रसिध कृष्णानेदेखील ४ विकेट्स देत त्याला चांगली साथ दिली. यादरम्यान मोहम्मद सिराजने थेट जसप्रीत बुमराहला मागे टाकत एका खास यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

सिराज आणि प्रसिधच्या ४ विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडला २४७ धावांवर सर्वबाद केलं. इंग्लंडने पहिल्या डावात २३ धावांची आघाडी मिळवली. पण भारतानेही दुसऱ्या डावात चांगली सुरूवात करत ही आघाडी मोडून काढली. यशस्वी जैस्वालने यादरम्या अर्धशतक झळकावलं, तर भारताने दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस २ बाद ७५ धावा केल्या आहेत.

चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने इंग्लंडचे ४ विकेट घेतले. सिराजने ऑली पोप आणि जो रूट आणि जेकब बेथल यांना आपल्या भेदक गोलंदाजीवर पायचीत केलं. तर अखेरीस हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड करत इंग्लंडचा डाव आटोपला. यासह, सिराज इंग्लंडच्या भूमीवर कसोटीमध्ये सर्वाधिक वेळेस ४ विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.

सिराजने आता इंग्लंडच्या भूमीवर ६ वेळा ४ विकेट घेतले आहेत, तर जसप्रीतने ५ वेळा ४ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे सिराजने फक्त १९ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर जसप्रीत बुमराहने २२ डावांमध्ये ५ वेळा ४ विकेट घेतले आहेत. दुसरीकडे, इशांत शर्माने इंग्लंडच्या भूमीवर कसोटीमध्ये २४ डावांमध्ये ४ वेळा ४ विकेट घेतले आहेत. याशिवाय, चेतन शर्मा यादीत चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे त्यांनी फक्त ४ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

इंग्लंडच्या मैदानावर सर्वाधिक वेळेस ४ विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

मोहम्मद सिराज – ६ वेळा – १९ डाव
जसप्रीत बुमराह – ५ वेळा – २२ डाव
ईशांत शर्मा – ४ वेळा – २४ डाव
चेतन शर्मा – ३ वेळा – ४ डाव
सुभाष गुप्ते – ३ वेळा – ७ डाव
जहीर खान – ३ वेळा – ८ डाव

सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडने टेकले गुडघे

भारताकडून पहिल्या डावात सिराजने १६.२ षटकांमध्ये ४ विकेट घेतले. यादरम्यान त्याने ५.३० च्या इकॉनॉमी रेटसह ८६ धावा दिल्या. त्याच्याशिवाय प्रसिद्ध कृष्णानेही ४ विकेट घेतले. त्याने १६ षटकांत ६२ धावा देत ४ विकेट घेतले.