Mohammed Siraj Creates History: मोहम्मद सिराजने इंग्लंड दौऱ्यावर आणि खास करून अखेरच्या कसोटीत केलेली कामगिरी वर्षानुवर्षे क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात राहणार आहे. भारताच्या ओव्हलच्या मैदानावरील ६ धावांनी विजयात मोहम्मद सिराजने मोठी भूमिका बजावली. या सामन्यात त्याने सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडच्या फलंदाजीला सुरूंग लावला. यासह भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. सिराजने गेल्या ४१ वर्षांमध्ये कोणालाही न जमलेली कामगिरी करून दाखवली आहे.
चौथ्या डावात सिराजने १०४ धावांत ५ बळी घेत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. झॅक क्राऊले, ओली पोप, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन आणि गस अॅटकिन्सन यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स चटकावत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्याआधी, सिराजने पहिल्या डावात चार बळी घेतले आणि ८६ धावा देऊन ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक आणि जेकब बेथल यांना बाद केलं.
ओव्हलच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू – मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराजने यासह संपूर्ण सामन्यात ९ विकेट्स घेत १९० धावा दिल्या. मोहम्मद सिराजने यासह उत्कृष्ट कामगिरी करत मोठा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. ओव्हल कसोटीतील चौथ्या डावात पाच विकेट्स घेणारा मोहम्मद सिराज हा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे.
ओव्हल इथे झालेल्या कसोटींमध्ये चौथ्या डावात पाच विकेट पटकावणारा सिराज हा मायकेल होल्डिंग यांच्यानंतरचा पहिलाच विदेशी खेळाडू आहे. होल्डिंग यांनी १९८४ मध्ये या मैदानावर अशी कामगिरी केली होती. सिराज हा इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर ही कामगिरी करणारा आठवा गोलंदाज आहे, ज्यापैकी सात वेगवान गोलंदाज आहेत.
ओव्हलच्या मैदानावर चौथ्या डावात पाच बळी घेणारे विदेशी खेळाडू
फ्रेरडरिक स्पोफोर्थ – ऑस्ट्रेलिया – ७ बळी – १८८२
जे जे फेरिस – ऑस्ट्रेलिया – ५ बळी – १८९०
क्लॅरी ग्रीमेट – ऑस्ट्रेलिया – ५ बळी – १९३४
फजल मेहमूद – पाकिस्तान – ६ बळी – १९५४
केथ बोयस – वेस्ट इंडिज – ६ बळी – १९७३
मायकल होल्डिंग – वेस्ट इंडिज- ६ बळी – १९७६
मायकल होल्डिंग – वेस्ट इंडिज- ५ बळी – १९८४
मोहम्मद सिराज – भारत – ५ बळी – २०२५
१९९७ नंतर भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांकडून असा पराक्रम करणारा सिराज हा पहिलाच खेळाडू आहे. ओव्हल मैदानावर चौथ्या डावात पाच विकेट घेणारा शेवटचा इंग्लंडचा खेळाडू अँडी कॅडिक होते, ज्यांनी १९९७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इंग्लंड दरवर्षी या मैदानावर किमान एक सामना तरी खेळतोच पण त्यानंतर हा पराक्रम कोणालाच जमलेला नाही.
दरम्यान, २००५ मध्ये शेन वॉर्ननंतर सिराज हा पहिलाच विदेशी खेळाडू आहे ज्याने मैदानावर नऊ बळी घेतले आहेत. वॉर्नशिवाय (२००१ आणि २००५) २१ व्या शतकात इंग्लिश खेळाडू वगळता कोणताही खेळाडू ओव्हल मैदानावर ९ किंवा त्याहून अधिक बळी घेऊ शकला नाही. सिराजच्या आधी १९९२ मध्ये पाकिस्तानचा वसीम अक्रम हा ओव्हलवर नऊ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा विदेशी संघाचा अखेरचा वेगवान गोलंदाज होता.
२०११ मध्ये ग्रॅमी स्वाननंतर ओव्हल येथे एकाच कसोटी सामन्यात इतक्या विकेट्स घेणारा सिराज हा पहिलाच खेळाडू आहे. २००४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध स्टीव्ह हार्मिसननने ओव्हल येथे झालेल्या कसोटी सामन्यात सिराजसारखी कामगिरी केली होती. भारतीय वेगवान गोलंदाजाच्या विकेट्सच्या पराक्रमाची बरोबरी करणारा तो अखेरचा इंग्लिश वेगवान गोलंदाज होता.