ट्वेन्टी-२० सामन्यांमुळे खेळात भरपूर पैसा आला आहे, खेळाडूंची आर्थिक स्थिती सुधारली आहे. मात्र हे होताना खेळातील आत्मा गमावला गेला आहे हे मत व्यक्त केले आहे पाकिस्तानचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सादिक महंमद यांनी.
पाकिस्तान व भारत यांच्यातील क्रिकेट मालिकेकरिता पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्यांना सदिच्छा राजदूत म्हणून पाठविले आहे. सादिक महंमद यांनी १९७० च्या दशकात  कसोटी सामने गाजविले.
ट्वेन्टी२० क्रिकेटच्या स्वरूपाविषयी  सादिक यांनी सांगितले, पैसा कोणाला नको आहे मात्र यामुळे खेळाडूंच्या कारकिर्दीवर अनिष्ट परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांची लवकर दमछाक होऊ लागली आहे तसेच त्यांच्या तंदुरुस्तीवर अनिष्ट परिणाम होऊ लागला आहे. खेळाडूंच्या दुखापती वाढू लागल्या आहेत. सततच्या व वेगवेगळ्या स्वरूपाच्या क्रिकेटमुळे कसोटी सामन्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे. दिवस-रात्र स्वरूपाच्या सामन्यांमध्ये दवामुळेही गोलंदाजी बिघडू शकते व त्याचा परिणाम खेळाडूंच्या कारकिर्दीवर होऊ शकतो. क्रिकेट हा आता सभ्य गृहस्थांचा खेळ राहिलेला नाही.
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीविषयी सादिक म्हणाले, त्याचा हा निर्णय योग्य असला तरी त्याने हा निर्णय ट्वेन्टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी आठ-दहा दिवस अगोदर घ्यायला पाहिजे होता. अर्थात त्याची निवृत्ती संभाव्य आहे हे लक्षात घेऊन भारतीय निवड समितीने अगोदरच त्याच्या जागी कोणता खेळाडू योग्य हे ठरविण्याबाबत योग्य नियोजन करायला पाहिजे होते.
संरक्षणासाठी मी जेव्हा हेल्मेट घालणारा पहिलाच क्रिकेटपटू होतो, त्या वेळी माझी खूप टिंगल करण्यात आली होती. आता बहुसंख्य खेळाडू हेल्मेट वापरतात, असेही सादिक म्हणाले.
पाकिस्तानकडे आता पुन्हा भेदक द्रुतगती गोलंदाज तयार होऊ लागले आहेत. त्याचे श्रेय वासिम अक्रम व वकार युनुस यांना द्यावे लागेल. त्यांच्या प्रेरणेनेच आमच्या देशात ठिकठिकाणी वेगवान गोलंदाजांसाठी अकादमी सुरू झाल्या आहेत, असेही सादिक यांनी सांगितले.
भारत व पाकिस्तान यांच्यात पूर्वी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सामने होत असत. आता या सामन्यांमध्ये कटुता अधिक प्रमाणात दिसून येऊ लागली आहे. दोन्ही देशांमध्ये पुन्हा सामने सुरू झाले आहेत ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. या सामन्यांची नियमितता वाढली तर हे दोन्ही देश अन्य देशांपेक्षा भारी ठरतीला असाही आत्मविश्वास सादिक यांनी व्यक्त केला.