पाकिस्तानी क्रिकेट संघाला लागलेला मॅच फिक्सिंगचा डाग पूर्णपणे धुतला गेलेला नसतानाच आता संघातील आजी-माजी खेळाडूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करीत मॅच फिक्सिंग प्रकरणाला दुजारो दिल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. शाहिद आफ्रिदी आणि जावेद मियाँदाद या दोघांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे पाकिस्तानी संघात सारेकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. या दोघांमधील शाब्दिक चकमकींमुळे पाकिस्तानमधील क्रिकेट वर्तुळातील वातावरण ढवळून निघाले आहे.
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी मॅच फिक्सिंग करत होता आणि आपण ते डोळ्यांनी बघितले असल्याचा आरोप जावेद मियाँदादने केला. त्यानंतर लगेचच शाहिद आफ्रिदीनेही त्याला प्रत्युत्तर दिले. मियाँदादला माझ्यापेक्षा पैशांमध्येच जास्त रस होता. मियाँदाद फक्त पैशांसाठीच खेळत होता, असे शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे. त्याच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूने अशा पद्धतीने बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे असल्याचा टोलाही आफ्रिदीने लगावला. पाकिस्तानमधील क्रीडा पत्रकार सलीम खलीक यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शाहिद आफ्रिदीने मियाँदादवर टीका केली.
पाकिस्तानमधील क्रीडारसिकांनी आपल्यावर भरभरून प्रेम केले. त्यामुळे निरोपाचा सामना खेळायला मिळणार की नाही, याबद्दल मी फार विचार करत बसत नाही, असे शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष नजम सेठी यांची भेट मी घेणार असून, त्यांच्याशी याबद्दल चर्चा करणार असल्याचेही त्याने म्हटले असल्याचे पाकिस्तानी दैनिक ‘डॉन’ने म्हटले आहे.
जावेद मियाँदादसाठी पैसा हेच सर्वस्व होते. त्यामुळेच त्याच्यात आणि इम्रान खान याच्यात फरक असल्याचे मतही शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले. त्यालाही मियाँदादने उत्तर दिले असून, माझ्यात आणि इम्रान खान याच्यात काय फरक आहे हे आमच्या चाहत्यांनाच जास्त माहिती आहे. तेच याचा न्यायनिवाडा करू शकतात, असे मियाँदादने म्हटले आहे.