तब्बल १६ वर्ष भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टला संध्याकाळी सात वाजल्यानंतर आपली निवृत्ती जाहीर केली. इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीने संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांनी मी निवृत्त होत आहे असं समजावं. धोनीने निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट आणि ७ वाजून २९ मिनीटांचीच वेळ का निवडली यावर गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. महेंद्रसिंह धोनीचा मॅनेजर मिहीर दिवाकरने धोनीने १५ ऑगस्टलाच निवृत्ती का जाहीर केली याचं कारण सांगितलं आहे.

“धोनीने आपल्या पूर्ण कारकिर्दीत भारतीय संघासाठी मोठं योगदान दिलं आहे. तो खऱ्या अर्थाने एक सच्चा देशभक्त आहे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीला रामराम करण्यासाठी १५ ऑगस्टपेक्षा जास्त चांगला दिवस धोनीसाठी सापडलाच नसता. गेल्या काही दिवसांपासून धोनीची निवृत्तीबद्दलची चर्चा सुरु होती, पण त्याने कधी निवृत्ती घ्यायची हे ठरवलं नव्हतं. यापुढे आयपीएल हे त्याचं प्राधान्य असणार आहे.” इंडिया टुडेशी बोलताना मिहीर दिवाकरने ही माहिती दिली.

अवश्य वाचा – धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकची BCCI ला विनंती, 7 नंबरची जर्सी रिटायर करा !

२०१९ विश्वचषकात न्यूझीलंडकडून झालेला पराभव हा धोनीच्या जिव्हारी लागला होता. काही महिन्यांपूर्वी धोनीच्या घरी पार पडलेल्या एका पार्टीमध्ये त्याच्या जवळच्या मित्राने तो टी-२० विश्वचषकानंतर खेळणार नाही असं सांगितलं होतं. पण आयपीएलमध्ये तो खेळत राहिल. परंतू जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपला अखेरचा सामना खेळण्याचं धोनीचं स्वप्न अखेरीस स्वप्नच राहिलं. यंदा विश्वचषक स्पर्धा होणार नाही हे समजल्यानंतर धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालाधीत आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत रंगणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी धोनीने CSK चे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. चेन्नईकडून पुढचे काही हंगाम खेळत राहणार असल्याचं धोनीने सांगितलं असून भविष्यातही संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला धोनीला आवडणार आहे…असंही धोनीने CSK प्रशासनाला कळवलं आहे.

अवश्य वाचा – धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करा, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची बीसीसीआयला विनंती