scorecardresearch

मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक २० ऑक्टोबरला

‘एमसीए’ निवडणुकीसाठी ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक २० ऑक्टोबरला
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) लांबणीवर पडलेली निवडणूक २० ऑक्टोबर रोजी होणार असून निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांनी सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

या कार्यक्रमानुसार ‘एमसीए’च्या निवडणुकीत १४ जागांचा निर्णय होईल. २० ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियमवरील ‘एमसीए’च्या कार्यालयात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक पार पडल्यानंतर दोन दिवसांनी ‘एमसीए’ची निवडणूक होणार आहे. ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ‘एमसीए’ने माजी अध्यक्ष आशीष शेलार यांची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.

‘एमसीए’ निवडणुकीसाठी ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारांची अंतिम यादी माघारीची मुदत संपल्यानंतर १४ ऑक्टोबरला जाहीर केली जाईल.

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी ‘एमसीए’च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. विद्यमान अध्यक्ष विजय पाटील निवडणूक लढवणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपाध्यक्ष अमोल काळे आणि मुंबई टवेन्टी-२० लीगचे कार्याध्यक्ष मिलिंद नार्वेकर हेसुद्धा अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. सचिव संजय नाईक हे पुन्हा या पदासाठी उत्सुक असून त्यांना कार्यकारी परिषदेचे सदस्य अजिंक्य नाईक आव्हान देऊ शकतील.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या