गतवर्षी रणजी चालिसाचा पराक्रम साकारणाऱ्या ‘खडूस’ मुंबईने गुरुवारी अनपेक्षित विजयासह आपले आव्हान शाबूत राखले. इक्बाल अब्दुल्ला आणि विशाल दाभोळकर या दोन्ही डावखुऱ्या फिरकीपटूंनी गुजरातच्या नऊ फलंदाजांना माघारी धाडल्यामुळे अखेरच्या रणजी साखळी सामन्यात मुंबईने गुजरातवर २७ धावांनी विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये मुंबईचा सामना महाराष्ट्रबरोबर वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
मुंबईने गुजरातपुढे विजयासाठी १७५ धावांचे आव्हान ठेवले होते, पण डावखुऱ्या फिरकी माऱ्यापुढे गुजरातचा डाव १४७ धावांमध्येच संपुष्टात आला. या विजयामुळे मुंबईने २९ गुणांसह ‘अ’ गटामध्ये तिसरे स्थान पटकावले आहे, तर पराभवामुळे गुजरातचे आव्हान संपुष्टात आले आहे.
सामन्याच्या तिन्ही दिवसांवर मुंबईवर गुजरातचे वर्चस्व पाहायला मिळाले, पण अखेरच्या दिवशी मुंबईने आपल्या फिरकीच्या तालावर गुजरातच्या फलंदाजांना नाचवत विजय मिळवला. पहिल्या डावात सहा बळी मिळवणाऱ्या इक्बालने दुसऱ्या डावातही पाच बळी मिळवत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर विशाल दाभोळकरने चार बळी घेत त्याला सुयोग्य साथ दिली. गुजरातकडून दहा चौकारांच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारत अक्षर पटेलने एकाकी झुंज दिली, पण त्याला अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. गुजरातच्या चार फलंदाजांना या वेळी भोपळाही फोडता आला नाही, तर त्यांच्या अखेरच्या पाच फलंदाजांना फक्त पाच धावाच करता आल्या. इक्बालने या वेळी ४४ धावांत ५ बळी मिळवले, तर दाभोळकरने ३३ धावांत ४ बळी टिपले. इक्बालने या सामन्यात एकूण ११ बळी घेण्याची किमया साधत मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १५४
गुजरात (पहिला डाव) : २५३
मुंबई (दुसरा डाव) : २७३
गुजरात (दुसरा डाव) : ५६ षटकांमध्ये सर्व बाद १४७ (अक्षर पटेल ६५; इक्बाल अब्दुल्ला ५/४४, विशाल दाभोळकर ४/३३)
गुण : मुंबई- ६, गुजरात- ०.
झहीरच्या उपलब्धतेची मुंबईला आशा
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर ८ ते १२ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान खेळावा, अशी मुंबईला आशा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परतलेल्या झहीरच्या समावेशामुळे मुंबईचा संघ अधिक मजबूत होईल. ‘‘उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी उपलब्धतेविषयी झहीर शुक्रवारी कळवणार आहे. याच दिवशी दुपारी निवड समितीची बैठक होणार आहे. झहीर या सामन्यात खेळेल, अशी आम्हाला आशा आहे,’’ असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी सांगितले.
जम्मू आणि काश्मीर प्रथमच बाद फेरीत
अगरतला : जम्मू आणि काश्मीर संघाने इतिहास रचत रणजी क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई करत जम्मू आणि काश्मीर संघाने बाद फेरी गाठली. ‘क’ गटामध्ये जम्मू आणि काश्मीर आणि गोवा या दोन्ही संघांचे समान २८ गुण झाले होते, पण गणिती समीकरणामध्ये अवघ्या ०.००१ गुणांनी सरस ठरत त्यांनी बाद फेरी गाठली.
बाद फेरीत पोहोचणे अविस्मरणीय -रसूल
नवी दिल्ली : जेव्हा गरज होती तेव्हा त्याने आघाडी सांभाळून आपला लढावू बाणा दाखवून जम्मू आणि काश्मीरला प्रथमच बाद फेरीत पोहोचवले. या संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या परवेझ रसूलमुळे संघाला ऐतिहासिक कामगिरी करता आली. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्यावर रसूलला गहिवरून आले होते आणि माझ्यासाठी हे अविस्मरणीय असल्याचे त्याने सांगितले.
‘‘या क्षणी माझ्या काय भावना आहेत, त्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, माझ्याकडे खरे तर शब्दच नाही. आता संघातील खेळाडू पंजाबशी सामना खेळण्यासाठी आतूर आहेत, त्यांच्या मनामध्ये आता कोणतीही भीती नाही. त्यांच्याकडे युवराज सिंग आणि हरभजन सिंगसारखे नावाजलेले खेळाडू असले तरी त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे रसूलने सांगितले. तो पुढे म्हणाला की, ‘‘ या कामगिरीच्या जोरावर आम्हाला पुढच्या वर्षी ‘ब’ गटामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे आणि आमच्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. माझ्याकडूनही चांगली कामगिरी झाली आणि या कामगिरीची संघाला मदत झाल्याचा मला आनंद आहे.
महाराष्ट्राचा आसामवर विजय
गुवाहाटी : आसामवर १२८ धावांनी विजय मिळवत महाराष्ट्राने बाद फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राचा सामना मुंबईशी होणार आहे. महाराष्ट्राच्या ३४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आसामचा डाव २१५ धावांवर संपुष्टात आला. अक्षय दरेकरने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात चार असे सामन्यात एकूण दहा बळी मिळवत विजयात सिंहाचा वाटा उचलला.