करोनामुळे ४ मे रोजी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १४व्या हंगामाचा डाव अर्ध्यावरती थांबवण्यात आला होता. आता जवळपास साडेचार महिन्यांनंतर ‘आयपीएल’चा दुसरा डाव आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यातच आज पहिल्याच सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार असल्याचं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकर देखील शनिवारी टीमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सामील झाला होता. त्यामुळे आजची मॅच चांगलीच रंगणार एवढं मात्र नक्की.

“मेंटॉर. आयकॉन. लिजेंड. मास्टर ब्लास्टर अबू धाबी येथील ट्रेनिंग ग्राऊंडवर आमच्यासोबत सामील झालाय,” असं कॅप्शन देत मुंबई इंडियन्सने ट्विटरवर सचिन तेंडुलकरचा खेळाडूंसोबत मैदानावरचा व्हिडिओ शेअर केलाय. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओत संघातील खेळाडू आपला मेंटॉर सचिन तेंडुलकरचे मैदानावर स्वागत करताना दिसत आहेत. तसेच मी मुंबई इंडियन्सची जर्सी घालण्यास उत्सुक असल्याचं सचिनने म्हटलंय.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या मिनी लिलावात २० लाख रुपयांना खरेदी केले होते. सचिन गेल्या आठवड्यात यूएईमध्ये आला. त्यानंतर त्याला ५ दिवस अलगीकरणात राहावे लागले होते. सर्व प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर सचिनने टीमची भेट घेतली. मुंबई इंडियन्सच्या बसमध्ये चढल्यानंतर त्याने कर्णधार रोहित शर्मा, झहीर खान आणि राहुल संघवी यांच्यासोबतचा सेल्फी शेअर केला होता.