भारताचा धडाकेबाद फलंदाज युवराज सिंग याने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीला पुर्णविराम देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेच त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. या निवृत्तीबरोबरच आयपीएलमधील युवराजची खेळी ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून शेवटची खेळी ठरली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये युवराज पहिल्यांदाच मुंबईच्या संघामधून खेळला. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाने युवराजला निवृत्तीनंतर ट्विटवरुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

२०१९ चे आयपीएल मुंबईकडून खेळणाऱ्या युवराजने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅण्डलवरुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ‘युवी करु शकतो. युवीने करुन दाखवले. नेहमीच. धन्यवाद चॅम्पियन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तुझ्यासारख्या मॅच विनरची कमी कायमच जाणवेल,’ असं ट्विट मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आले आहे.

दरम्यान निवृत्तीची घोषणा करताना युवराजने कारकिर्दीच्या शेवटी आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळाली असती तर अधिक समाधान वाटले असते अशी खंत बोलून दाखवली. इतकी कारकिर्द देशासाठी खेळल्यानंतर चांगला शेवट व्हावा असं वाटत होतं असं भावूक झालेला युवराज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना ही संधी मिळेल असं वाटलं होतं. युवराजला आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये मुंबईकडून खेळताना १६ पैकी केवळ चार सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. त्यापैकीही केवळ एका सामन्यात त्याला चमक दाखवता आली होती.