मुंबई कबड्डी निवडणूक
मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या २५ ऑगस्टला होणाऱ्या पंचवार्षिक (२०१९-२४) निवडणुकीसाठी सत्ताधारी मारुती जाधव गटाला कृष्णा तोडणकर गट आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहे. दोन्ही गटांच्या प्रत्येकी २५ उमेदवारांव्यतिरिक्त माजी अध्यक्ष मीनानाथ धानजी आणि सूर्यकांत भोईटे यांच्यासह चार अपक्ष उमेदवार अशा एकूण ५४ उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विद्यमान अध्यक्ष अशोक (भाई) जगताप यांच्या नेतृत्वाखालील मारुती जाधव गटात शिवकुमार लाड, मनोहर इंदूलकर, शुभांगी पाटील, गो. वि. पारगांवकर, रामचंद्र जाधव, आनंदा शिंदे, संजय सूर्यवंशी, दिनेश पाटील, अनिल घाटे, मनोहर साळवी आणि विश्वास मोरे या अनुभवी उमेदवारांचा समावेश आहे. याचप्रमाणे सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या कृष्णा तोडणकर गटातही दिगंबर शिरवाडकर, मेघाली म्हसकर, पराग सुर्वे, महेश सावंत, सचिन कासारे, संदीप वरखडे आणि राजेश पाडावे यांच्यासारखे तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे २५ जागांवर एकाच गटाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी दिसते आहे, असा कबड्डी क्षेत्रातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.
ज्या गटाचे १३ उमेदवार निवडून येतात, तेच सत्ता स्थापन करू शकतील. या पार्श्वभूमीवर धानजी, भोईटे, संदेश महाडिक आणि दगडू वलावंडे हे उमेदवार निवडून आल्यास निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.