मुंबई मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे मुंबईकरांच्या जीवनातील मानाचं पान. घडय़ाळाच्या काटय़ानुसार धावणाऱ्या मुंबईकरांना तंदुरुस्त राखण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई मॅरेथॉनने यशाची अनेक शिखरे गाठली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत प्रत्येक वर्षी वाढ होत चालली आहे, यावरूनच मुंबई मॅरेथॉन शर्यतीच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.
२००४ मध्ये सुरुवात झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये तब्बल २२ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. दहाव्या वर्षांत पाऊल टाकणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. विशेष म्हणजे, पूर्ण मॅरेथॉन आणि अर्धमॅरेथॉन शर्यतीत धावणाऱ्यांची संख्या चौपट झाली आहे. ड्रीम रन, व्हिलचेअर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या शर्यतीत सहभागी होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ‘ग्रेटेस्ट रेस ऑन अर्थ’मध्ये स्थान मिळालेल्या या शर्यतीने २००९मध्ये आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचा (आयएएएफ) रौप्य दर्जा मिळवला. दोन वर्षांनंतरच सुवर्ण दर्जा या शर्यतीने प्राप्त केला.
आशियातील सर्वाधिक श्रीमंत मॅरेथॉन असा नावलौकिक मिळवणाऱ्या या शर्यतीने भारताला अनेक धावपटू दिले आहेत. अनेक धावपटूंना आपल्या कर्तृत्वाची छाप पाडण्याची संधी या मॅरेथॉनने दिली आहे. सुधा सिंग, कविता राऊत यांनी या स्पर्धेद्वारेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमक दाखवली आहे. ऑलिम्पिकच्या मॅरेथॉन शर्यतीत धावण्याचा मान मिळवणाऱ्या रामसिंग यादवने ब दर्जाचा ऑलिम्पिक निकष मुंबई मॅरेथॉनमध्येच पार केला होता. २ तास १६ मिनिटे ५९ सेकंद अशी वेळ देत त्याने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते.

वर्ष    पूर्ण मॅरेथॉन    अर्धमॅरेथॉन    एकूण स्पर्धक
२००४     ८००          ३५००                   २२०००
२००५    १०००         ५०००                 २५०००
२००६    १२००        ७०००                 २८०००
२००७    १५००        ७५००                ३००००
२००८    १८००        ८५००                 ३३०००
२००९    २५००        १००००               ३५६५०
२०१०    २८००        ११०००                ३८०००
२०११    २८००        ११०००                 ३८५४०
२०१२    २७७५        १३९४६              ३८६००
२०१३    ४०६०        १२७००               ३८६२०