हैदराबादच्या धावांचा महोत्सव चौथ्या दिवशीही अविरत कायम होता. बव्हनाका संदीपने हैदराबादच्या डावातील तिसऱ्या शतकाची नोंद केली. त्यामुळे हैदराबादला रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अ गटातील साखळी सामन्यात तीन गुणांची कमाई करता आली, तर बलाढय़ मुंबईला फक्त एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या तीन रणजी सामन्यांनंतर मुंबईच्या खात्यावर फक्त ७ गुण जमा झाले आहेत.
सोमवारच्या ३ बाद ४२३ धावसंख्येवरून हैदराबादने आपल्या डावाला मंगळवारी पुढे प्रारंभ केला आणि ६९९ धावांचा डोंगर उभारला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात संदीपने २२८ चेंडूंत ११७ धावांची खेळी अखेरच्या दिवशी साकारली. २८८ मिनिटांच्या आपल्या खेळीत संदीपने ११ चौकार ठोकले. सोमवारी अक्षत रेड्डी आणि हनुमा विहारी यांनी दिमाखदार शतके साकारत हैदराबादच्या डावाचा भक्कम पाया रचला होता. मुंबईने पहिल्या डावात ४४३ धावा उभारल्या होत्या. त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनीच अडीच दिवस खेळून काढला. या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी मिळून एकंदर ११५० धावा काढल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक आदित्य तारे वगळता मुंबईच्या सर्वच खेळाडूंनी गोलंदाजी केली. पण हैदराबादच्या फलंदाजांनी त्यांची यथेच्छ धुलाई केली.
सोमवारी रेड्डी आणि विहारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८६ धावांची मोठी भागीदारी केली होती. मंगळवारी संदीप आणि कोल्ला सुमथ यांनी पाचव्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी रचली. त्यामुळेच हैदराबादला सातशेच्या आसपास धावा करता आल्या. मुंबईकडून अंकित चव्हाणने १८४ धावांत ३ बळी घेतले, तर अविष्कार साळवी आणि रमेश पोवार यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
 संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४४३
हैदराबाद (पहिला डाव) : २०७.३ षटकांत सर्व बाद ६९९ (अक्षत रेड्डी १९६, हनुमा विहारी १९१, बव्हनाका संदीप ११७; अंकित चव्हाण ३/१८४)