छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत मुंबईने  सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. पुण्याखालोखाल नाशिकनेही चमकदार कामगिरी केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा शेवटचा दिवसही मुंबईच्या खेळाडूंनी गाजविला. १९ वर्षांखालील आर्टिस्टिक्स गटात जयेंद्र पाटील, शांताम लोणे, ओमकार परब, वैभव शाह, अक्षय बोरकर, यांच्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर विजेतेपद मिळविले. पुण्याने व्दितीय तर औरंगाबादने तृतीय क्रमांक मिळविला.
१४ वर्षांखालील गटात पुण्याच्या मृण्मयी चौगुलेने प्रथम, मुंबईच्या श्रावणी वैद्यने व्दितीय तर पुण्याच्या प्राची दिघेने तृतीय स्थान राखले. गट विजेतेपद मुंबईने २१०.६० गुणांसह मिळविले. पुण्याने व्दितीय (२०७.६०) तर नाशिकने (९४.९५) तृतीय स्थान मिळविले. १७ वर्षांखालील गटात यजमान नाशिकला सार्थक साखलाने फ्लोअर प्रकारात पहिले सुवर्ण मिळवून दिले. पृथ्वीराज फडणीस, प्रेम पाटील, दर्शन घाणेकर, आशिष शिरोडकर, उर्मिल शहा यांच्या कामगिरीमुळे या गटात मुंबईला विजेतेपद मिळाले. सार्थक साखला, विकी कोठुळे, सिध्दार्थ ढाकणे, उत्कर्ष मोराणकर, पवन सोनवणे यांनी नाशिकला व्दितीय स्थानी पोहोचविले. पुण्याने तृतीय क्रमांक मिळविला.  १९ वर्षांखालील अ‍ॅक्रोबॅटिक्स गटात महिला जोडी प्रकारात कोल्हापूरच्या भाग्यश्री चौघुले व अनुराधा मेहत्रे, पुरूषांमध्ये पुण्याच्या ऋषिकेश मोरे व तन्मय बद्रा तर संमिश्र प्रकारात मुंबईच्या कुणाल खांडेकर व रूतूजा जगदाळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष विलास पाटील, नरेंद्र छाजेड, विभागीय क्रीडा उपसंचालक चंद्रकांत अधाणे, ग्रँडमास्टर विदीत गुजराथी, जिल्हा माहिती अधिकारी देवेंद्र पाटील, अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्र सिंग आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.