आदिती दांडेकर व जान्हवी वर्तक यांची सुरेख कामगिरी आणि दोघींना सिमरन फाटकची मिळालेली साथ, या जोरावर मुंबईने राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत १४ वर्षांआतील गटामध्ये रिदॅमिक प्रकारात सांघिक विजेतेपद पटकाविले. पुण्याने सेजल खेडकरच्या खेळामुळे उपविजेतेपद तर यजमान नाशिकने तिसरा क्रमांक मिळविला.
येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मंगळवारपासून या स्पर्धेला सुरूवात झाली. सकाळ सत्रात झालेल्या ऱ्हिदमिक १४ वर्षांआतील गटात अपेक्षेप्रमाणे मुंबईने वर्चस्व राखले. मुंबईने १७२.२० गुण, पुण्याने १२८.१७ तर नाशिकने ५६.८५ गुण मिळविले. आदिती दांडेकर, जान्हवी वर्तक तसेच पुण्याच्या सेजल खेडकरच्या लयबध्द हालचालींना उपस्थितांनी दाद दिली. आदितीने हुप, बॉल, रिबन या तीन प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावित ६१.३५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. मुंबईच्याच जान्हवीने ५५.९० गुणांसह व्दितीय तर ४६.७७ गुणांसह पुण्याच्या सेजलने तिसरा क्रमांक मिळविला. मुंबईच्या सिमरन फाटकने क्लब्स प्रकारात प्रथम स्थानावर झेप घेतली. प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद््घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सरचिटणीस महेंद्र चेंबूरकर, विभागीय क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाणे, नरेंद्र छाजेड, जिल्हा संघटनेचे किरण कविश्वर, अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्र सिंग, महाराष्ट्र बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र चौबळ उपस्थित होते.
यावेळी रूचा दिवेकर, श्रावणी राऊत, शिप्रा जोशी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह जयेंद्र पाटील, सचिन सपकाळ, ओंकार शिंदे या राष्ट्रीय खेळाडूंनी विविध प्रात्यक्षिके केली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2012 रोजी प्रकाशित
ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये मुंबई विजेते
आदिती दांडेकर व जान्हवी वर्तक यांची सुरेख कामगिरी आणि दोघींना सिमरन फाटकची मिळालेली साथ, या जोरावर मुंबईने राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत १४ वर्षांआतील गटामध्ये रिदॅमिक प्रकारात सांघिक विजेतेपद पटकाविले. पुण्याने सेजल खेडकरच्या खेळामुळे उपविजेतेपद तर यजमान नाशिकने तिसरा क्रमांक मिळविला.

First published on: 28-11-2012 at 02:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai wins in rhythmic gymnastics