आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा
मुंबई जिल्हा (१७ वर्षांखालील) संघाने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेचे जेतेपद पटकावले. टायब्रेकरमध्ये रंगलेल्या अंतिम लढतीत मुंबईने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० अशा फरकाने पुणे जिल्ह्यावर विजय मिळवला. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता.
उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने ४-१ अशा फरकाने जळगावचा धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याच कामगिरीची पुनरावृत्ती त्यांनी अंतिम सामन्यात केली. १३व्या मिनिटाला मुंबईसाठी अर्फत अन्सारीने पहिला गोल नोंदवला. पुण्याकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला. एडवीन फलॅरोने फ्री किकवर गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांकडून अटीतटीचा खेळ झाल्याने निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. पेनल्टी शूटआऊटमध्ये मुंबईने बाजी मारली. मुंबईच्या अर्फत अन्सारीला स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू, तर मुंबईच्याच मुसद्दीक खानला सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून गौरवण्यात आले.