२०११ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यासह अनेक ऐतिहासिक सामन्यांचे साक्षीदार असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे लवकरच नामांतरण होणार आहे. गेल्या चार दशकांपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांची मुंबईकरांना मेजवानी देणाऱया या स्टेडियमला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष एस.के. वानखेडे यांचे नाव देण्यात आले होते. पण आता वानखेडे या नावासोबतच प्रायोजकांचेही नाव जोडले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासंबंधीचा करार देखील मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि डीडीबी मुद्रा या जाहिरात कंपनीमध्ये झाल्याची माहिती पुढे आली आहे.

वाचा: वानखेडेवरील भारत-इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिकीट दरात कपात

‘एमसीए’च्या सुत्रांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियमचे नामांतरण होण्याची दाट शक्यता असून, स्टेडियमच्या नावाच्या अगोदर किंवा शेवटी प्रायोजकांचे नाव जोडले जाईल. प्रायोजकत्वातून ‘एमसीए’ला आपला महसूल वाढविण्यात फार मोठी मदत होणार आहे. महसूल वाढविण्यासाठी असे पर्याय चोखंदळून पाहण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही, असे ‘एमसीए’च्या अधिकारयाने सांगितले.
करारासंबंधी सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी ‘एमसीए’च्यावतीने एक समिती देखील स्थापन करण्यात आली असून, या समितीमध्ये ‘एमसीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सीएस नाईक आणि नवीन शेट्टी यांचा समावेश आहे.

जाहीरात कंपनीसोबत करार निश्चित झाल्यास स्टेडियमच्या नावात बदल करण्याचेही अधिकार संबंधित जाहीरात कंपनीकडे असतील. त्यामुळे हा करार झाल्यास वानखेडे स्टेडियमच्या नावात नेमका कोणता बदल करण्यात येणार याकडे साऱयांचे लक्ष असणार आहे.