लखनऊ : सलामीवीर यश नाहरने (६८ चेंडूंत नाबाद १०३ धावा) साकारलेल्या दिमाखदार शतकाच्या बळावर महाराष्ट्राने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राने गोव्याचा ७३ धावांनी फडशा पाडून ‘अ’ गटातील अग्रस्थानासह सलग चौथा विजय नोंदवला.

प्रथम फलंदाजी करताना नाहर आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड (४४) यांनी १०४ धावांची सलामी दिल्याने महाराष्ट्राने २० षटकांत ३ बाद १७७ अशी धावसंख्या उभारली. चौथे अर्धशतक झळकावण्यात ऋतुराज अपयशी ठरला. नाहरने मात्र सहा चौकार आणि पाच षटकारांसह शतकाची वेस ओलांडली.

मग डावखुरा फिरकीपटू सत्यजीत बच्छावपुढे (३/२७) गोव्याची फलंदाजी ढेपाळली. शुभम रांजणे (३५) वगळता कोणीही गोव्याकडून प्रतिकार केला नाही. त्यामुळे १८.१ षटकांत १०४ धावांत त्यांचा डाव आटोपला. महाराष्ट्राने पाच सामन्यांतील चार विजयांचे १६ गुण कमावले. तमिळनाडूचेही तितकेच गुण आहेत. परंतु सरस धावगतीमुळे महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर तमिळनाडूला उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडावा लागेल.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ३ बाद १७७ (यश नाहर नाबाद १०३, ऋतुराज गायकवाड ४४; श्रीकांत वाघ १/२५) विजयी वि. गोवा १८.१ षटकांत सर्व बाद १०४ (शुभम रांजणे ३५; सत्यजीत बच्छाव ३/२७, मुकेश चौधरी २/१६)