जगातील दुसऱ्या क्रमांकाची महिला टेनिसपटू जपानच्या नाओमी ओसाकाला एका चुकीसाठी १५,००० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर अशी चूक पुन्हा झाली, तर मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही तिला बजावण्यात आले आहे. फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले. त्यामुळे ओसाकाला हा दंड बसला आहे.

फ्रेंच ओपनमध्ये ओसाकाने शानदार सुरुवात केली आणि रोमानियाच्या पेट्रिशिया मारिया टिगचा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. चार वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या ओसाकाने १ तास ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६३व्या क्रमांकावर असलेल्या पेट्रीशियाला ६-४, ७-६ (४) असे पराभूत केले.

 

हेही वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! १७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा

 

यूएस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनचे माजी विजेता ओसाका २०१९ नंतर या स्पर्धेत खेळत आहेत. गेल्या वर्षी दुखापतीमुळे तिला फ्रेंच ओपनमध्ये भाग घेता आला नाही. ग्रँड स्लॅम टूर्नामेंट्सच्या नियमांनुसार, जर खेळाडू सामन्यानंतर पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलण्यास नकार देत असेल तर त्यांना २०,००० अमेरिकन डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो.

हेही वाचा – क्वारंटाइन कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी घेतली आपल्या कुटुंबीयांची भेट

“२३ वर्षीय ओसाकाला दंड आणि भविष्यातील ग्रँडस्लॅमबाबत निलंबनाचा सामना करावा लागत आहे. ग्रँडस्लॅम नियमांमधील मुख्य घटक म्हणजे सामन्याचा निकाल काहीही असो, खेळाडूंनी मीडियाशी बोलणे ही एक जबाबदारी आहे”, असे आयोजकांनी सांगितले. फ्रेंच ओपनदरम्यान माध्यमांशी बोलणार नाही, असे ओसाकाने सांगितले होते.