भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांचे मत
सध्याचे क्रिकेटपटू फक्त अतिक्रिकेटची चर्चा करताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखणारे ट्रेनर, फिजियो अशी फळी दिमतीला आहे. पण आमच्यावेळी असे काहीच नसायचे. पण तरीही आम्ही स्वत:ला तंदुरुस्त राखण्यासाठी मेहनत घ्यायचो. १९४६च्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान विनू मंकड हे सलग २६ सामने खेळले होते. याच्यावरून त्यांची तंदुरुस्तीचा दर्जा काय असेल, याची कल्पना येते, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी आपले मत व्यक्त केले.
भारताचे तसेच जगातील महान अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या विनू मंकड यांच्या १०२व्या जयंतीनिमित्त लिजंड्स क्लबतर्फे क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये (सीसीआय) शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘विनू मंकड यांनी वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती. पण नंतर ते फिरकी गोलंदाजीकडे वळले. एक उत्कृष्ट फलंदाज, फिरकी आणि वेगवान गोलंदाजीवर पकड असल्यामुळे ते भविष्यात चांगले प्रशिक्षक होऊ शकले. त्याचबरोबर एक सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून नावारूपाला आले.’’
‘‘सध्या रविचंद्रन अश्विनच्या ‘मंकडिंग’ प्रकरणाची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा आहे. मात्र ‘मंकडिंग’चे जनक असलेल्या विनू यांना तेव्हा महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांनीही पाठिंबा दिला होता. ‘त्यांनी चांगले काम केले आहे,’ अशा शब्दांत ब्रॅडमन यांनी मंकड यांची पाठराखण केली होती,’’ असेही कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले.
‘‘कलकत्ता येथे सामने असताना तेथील ड्रेसिंगरूममधील एका खोलीत विनू मंकड, पॉली उम्रीगर, दत्तू फडकर यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडूंमध्ये गुप्त चर्चा व्हायची. बाकीचे खेळाडू दुसऱ्या खोलीत असायचे. पण आत काय चर्चा रंगतेय, हे कुणालाही कळायचे नाही आणि आम्हीही कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण मी जेव्हा कर्णधारपदी आलो, त्यावेळी आम्ही कधीही बंद खोलीत चर्चा केल्या नाही,’’ असेही त्यांनी नमूद केले.