गोंदिया जिल्हा सायकल पोलो असोसिएशन व महाराष्ट्र राज्य सायकल पोलो असोसिएशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेत छत्तीसगड संघाने वरिष्ठ, ज्युनियर व सबज्युनियर मुलींच्या गटात बाजी मारत तिहेरी यश संपादन केले. यजमान महाराष्ट्र संघ वरिष्ठ महिला व ज्युनियर मुलींमध्ये कांस्यपदक जिंकले.
गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ही स्पर्धा घेण्यात आली. वरिष्ठ महिलांच्या अंतिम सामन्यात छत्तीसगड संघाने चुरशीच्या लढतीत केरळ संघाला ५-४ अशा गोलफरकाने पराभूत केले. ज्युनियर मुलींच्या अंतिम सामन्यात छत्तीसगडने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत केरळ संघाला २३-० अशा मोठय़ा गोलफरकाने नमवून बाजी मारली. सबज्युनियर मुलींमध्ये छत्तीसगडने उत्तर प्रदेश संघाला ७-४ अशा गोलफरकाने नमवून विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय बास्केटबॉलपटू भावना कदम यांच्या हस्ते तिन्ही गटातील विजेत्या, उपविजेत्या व तिसऱ्या स्थानावरील संघाला पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष गजेंद्र फुंडे, भारतीय सायकल पोलो महासंघाचे महासचिव गजानन बुरडे, दिनेश सार्वे, महेंद्र हेमणे, आंतरराष्ट्रीय खेळाडू मिलिंद पटले उपस्थित होते.