वृत्तसंस्था, अहमदाबाद : महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. स्केटिंगमध्ये श्रद्धा गायकवाडने, तर टेनिसमध्ये पुरुष संघाने सोनेरी यश मिळविले. अ‍ॅथलेटिक्समध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ऐश्वर्याने ५२.६२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक जिंकले. यासह ऐश्वर्याने बीनामोलचा (५२.७१सेकंद) अकरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. महाराष्ट्राच्या डांयड्रा व्हॅलेदारेसने (११.६२ सेकंद) महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले. आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीवनी जाधव (१६ मिनिटे ३९.९७ सेकंद) पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदकाची मानकरी ठरली.

स्केट बोर्ड प्रकारात श्रद्धा गायकवाडने सुवर्णपदक मिळविले. उर्मिला पाबळे, शुभम सुराणाने रौप्यपदक पटकावले. निखिल शेलाटकरने कांस्यपदक जिंकले. आर्टिस्टिक कपल डान्स प्रकारात महाराष्ट्राच्या यशस्वी शाह व इलुरी कृ्ष्णा साई राहुल या जोडीने सुवर्णपदक मिळविले. खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी आगेकूच कायम राखली. टेनिसमध्ये महिला रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. तलवारबाजीत अजिंक्य दुधारे आणि गिरीश जकाते यांना कांस्यपदके मिळाली. कुस्तीत समीर पाटीलने ग्रीको-रोमनच्या ७७ किलो वजनी गटात एकमेव कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राला सायकिलगमधील पहिले पदक मयुरी लुटेने मिळवून दिले. महाराष्ट्र महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक संघाने २६३.६० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. श्रद्धा तळेकर, इशिता रेवाळे, सिद्धी हत्तेकर, मानसी देशमुख, सारिका अत्तरदे आणि सलोनी दादरकर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.

दोन्ही कबड्डी संघांना रौप्यपदक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या कबड्डी संघांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. दोन्ही संघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशने महाराष्ट्राचा २७-२२ असा पराभव केला. मध्यंतराला हिमाचलकडे १४-१० अशी आघाडी होती. हीच आघाडी निर्णायक ठरली. हिमाचलकडून साक्षी, पूजा यांनी अप्रतिम खेळ केला. महाराष्ट्राकडून पूजा यादव, सोनाली शिंगटेने झुंज दिली. पुरुषांच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राचे कडवे आव्हान २७-२३ असे परतवून लावले. शेवटच्या ४ मिनिटापर्यंत महाराष्ट्राकडे २ गुणांची आघाडी होती. पण राहुल चौधरीने लागोपाठच्या चढाईत गुणांची कमाई केली. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी अस्लमची पकड केली आणि महाराष्ट्राच्या हातून सामना निसटला.