आजवर आपण फुटबॉलचे देव फक्त टीव्हीवर पाहिलेत किंवा वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल वाचलेय, पण येत्या २७ एप्रिलला त्याच देवांची पावले भारताची क्रीडा पंढरी म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबईच्या डी.व्हाय. पाटील स्टेडियमला लागणार आहेत. ज्या युरोपियन संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण भारतीय फुटबॉलप्रेमी रात्र- रात्र जागवतो, त्याच बार्सिलोना आणि युवेंटस संघाच्या माजी रथी- महारथी खेळाडूंचा खेळ पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभणार असल्याची माहिती क्रीडा संघटक आणि डी.व्हाय.पाटील स्पोर्ट्स अकादमीचे सर्वेसर्वा डॉ. विजय पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत हा क्रिकेटचीच नव्हे तर फुटबॉलचीही फार मोठी बाजारपेठ आहे. भारताचे फुटबॉल भवितव्य फार उज्ज्वल आहे, त्यामुळेच भारतात फुटबॉलची पाळेमुळे खोलवर रूजावी म्हणून मोठी यंत्रणा सक्रीय झाल्याचे चित्र गेल्या दीड- दोन वर्षांत दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या फिफा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताने दमदार आणि स्फूर्तीदायक कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे भारतात फुटबॉलच्या विकासाला एक वेगळी चालना मिळाली आहे. भारतात फुटबॉलची केझ वाढावी म्हणून आता फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक कौशिक मौलिक यांनी भारतात फुटबॉलच्या देवांना खेळविण्याची आपली कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे पाठबळ आणि डॉ. विजय पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नवी मुंबईच्या क्रीडा पंढरीत स्पेनचा अव्वल संघ बार्सिलोना आणि इटालियन फुटबॉलची जान असलेल्या युवेंटस या दोन्ही युरोपियन संघांच्या माजी दिग्गजांना खेळविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाणार आहे.

बार्सिलोना क्लबचा अव्वल खेळाडू लिओनेल मेसी

मेस्सीकडून आदित्य ठाकरेंना जर्सी भेट
लवकरच बार्सिलोनाचे दिग्गज भारत भेटीवर येत आहेत. पण त्यापूर्वी हा संस्मरणीय सामना आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना प्रेमाचे प्रतिक म्हणून फुटबॉल स्टार लिओनल मेस्सीने आपले आटोग्राफ असलेली बार्सिलोना क्लबची जर्सी पाठवली आहे. आज ती जर्सी आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीत डॉ. विजय पाटील यांनी स्वीकारली.

या रे या… सारे या…
फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्याला मुंबईकरांची अभूतपूर्व गर्दी लाभलेली. तेव्हा फक्त फुटबॉल होत होता म्हणून मुंबईकरांनी गर्दी केली होती आणि आता तर फुटबॉलचे स्टार येणार आहेत. मुंबईकरांसाठी, फुटबॉलप्रेमींसाठी याची देही याची डोळा पाहण्यासारखा अनुभव आहे. मुंबईकरांनो येत्या २७ एप्रिलला फुटबॉलचा हा सामना पाहण्यासाठी सर्वांनी यावे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. या सामन्याची तिकीटे बुक माय शोवर ऑनलाईन उपलब्ध असून तिकीटांच्या किमती ५०० ते १५०० रूपयांपर्यंत ठेवल्या गेल्या आहेत.

कोण कोण खेळणार आहेत…
बार्सिलोना आणि युवेंटस या क्लबच्या दिग्गजांचा संघ असल्यामुळे या दोन्ही संघांत फार मोठी नावे आहेत. यात फिफा विश्वचषकात खेळलेले अनेक दिग्गजही आपले पदलालित्य दाखविण्यासाठी सज्ज करीत आहेत. यात बार्सिलोना संघात डेव्हिड ट्रेझग्युट, एडगर डेव्हिड, मोरेनो टोरीसेली, निकोला अमोरूसा, ख्रिस्तीयन झेनोनी, झॅम्बरोता, पाओलो मोण्टेरो, मार्प लुलिआनो, फॅब्रिझिओ रावानेलीसारखे अनेक स्टार खेळणार आहेत. तसेच युवेंटसमधून युआन कार्लोस रॉड्गेज, जुलिओ सालिनास,सिमाओ सॅब्रोसा, एरिक अबीदल, फ्रँक डी बोअरर, जोस एडमिलसनसह अनेक दिग्गज मुंबापुरीत येतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai barcelona vs juventus friendly match lionel messi
First published on: 05-04-2018 at 21:09 IST