भारताचे बास्केटबॉलमधील भवितव्य उज्ज्वल -बिल अॅलेक्सन
अनेक परदेशी संघांनी माटुंग्यातील डॉन बॉस्कोच्या मैदानावर आपला जलवा दाखवला असला तरी नॅशनल बास्केटबॉल लीगमधील (एनबीए) माजी खेळाडूंच्या ‘स्पोर्ट्सपॉवर’ संघाने आपल्या खेळाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले आहे. साडेसहापेक्षा जास्त फूट उंची, जबरदस्त शारीरिक क्षमता, वेग, चपळता, अफाट अनुभव आणि पासिंगचा सुरेख खेळ असा मिलाफ साधणाऱ्या अमेरिकेच्या या खेळाडूंनी सर्वाचीच मने जिंकली आहेत. चाळीसपेक्षाही जास्त वय असलेल्या या खेळाडूंचा वेग वाखाणण्याजोगा. पण अमेरिकेच्या या ‘स्पोर्ट्सपॉवर’ संघाचे प्रशिक्षक बिल अॅलेक्सन आणि व्यवस्थापक स्टुअर्ट लुकास मात्र भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर चांगलेच प्रभावित झाले आहेत.
भारताचे बास्केटबॉलमधील भवितव्य उज्ज्वल आहे, असे बिल अॅलेक्सन यांना वाटते. ते म्हणतात, ‘‘अनेक देशात खेळण्यासाठी आम्हाला निमंत्रणे येत असतात. त्यापैकी बऱ्याच देशांमध्ये जाऊन आम्ही खेळत असतो. पण भारतातील पहिल्याच दौऱ्यात आम्ही येथील खेळाडूंच्या कामगिरीवर खूश आहोत. ठिकठिकाणाहून आलेल्या भारतीय खेळाडूंनी एनबीएमधील माजी खेळाडूंनाही तोडीस तोड उत्तर दिले आहे. या गुणी खेळाडूंना घेऊन भारतीय संघाची बांधणी करायला हवी. गुणवत्ता शोधून काढल्यास, भारताचीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावेल, असे मला वाटते.’’
फुटबॉल, बेसबॉलप्रमाणे बास्केटबॉलची जगभरात क्रेझ वाढू लागली आहे. क्रिकेटप्रमाणे भारतातही हा खेळ लोकप्रिय होत आहे. भारताचा या खेळातील दर्जा उत्तम आहे, असे अॅलेक्सन यांनी सांगितले. सॅव्हियो बास्केटबॉल स्पर्धेतील ‘स्पोर्ट्सपॉवर’ संघाच्या कामगिरीबाबत स्टुअर्ट लुकास यांनी म्हटले की, ‘‘भारतातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आम्ही आतापर्यंत तिन्ही सामने जिंकले आहेत. पण गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्हाला कडवा प्रतिकार सहन करावा लागला. आता अंतिम फेरीत चांगली कामगिरी करून जेतेपदासह मायदेशात परतण्याचा आमचा निर्धार आहे.’’