टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देणाऱ्या नीरज चोप्राची जाहिरात सध्या चर्चेत आहेत. जाहिरातीत नीरज चोप्राने पाच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. यापूर्वी देखील नीरज चोप्राने जाहिरातीत काम केलं आहे. मात्र ही जाहिरात प्रेक्षकांना सर्वाधिक भावली आहे. या जाहिरातीत नीरज चोप्रा पत्रकार, चित्रपट दिग्दर्शक, मार्केटिंग गुरु, बँक लिपिक आणि एका तरुणाच्या भूमिकेत दिसत आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही खळखळून हसणं भाग पडत आहे. नीरज चोप्राने ही जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली आहे. तर क्रेडिट कार्ड एग्रिगेटर क्रेडच्या कमर्शियल संचालक अयप्पा केएम यांनी ही जाहिरात चित्रिकरणाचा अनुभव शेअर केला आहे. क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि नीरज चोप्रा या दोघांनी या ब्रँडच्या जाहिरातीसाठी काम केलं आहे. आयपीएल २०२१ लाँच झाल्यावर राहुल द्रविडची ‘इंदिरानगर का गुंडा’ ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

“आम्हाला वाटलं नीरज चोप्रा लाजाळू आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही. नीरज चोप्रा हा द्रविडच्या अगदी विरूद्ध आहे कधीतरी संवाद बोलताना जोरात हसायचा. तो जाहिरात करताना त्याचा आनंद घेत होता. आम्ही २० मिनिटात एक सीन करायचो. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून आम्हीही प्रभावित झालो आहोत. आम्ही एखादं गोष्ट सांगितल्यावर तो ती लगेच करायचा. सर्वच एकदम परफेक्ट होतं. अभिनयाबाबत काहीही माहिती नसताना इतकं करणं खरंच मोठी गोष्ट आहे.”, असं क्रेडिट कार्ड एग्रिगेटर क्रेडच्या कमर्शियल संचालक अयप्पा केएम यांनी सांगितलं.

“मला असं वाटतं की, नीरजला चित्रपट आवडत असावे, त्यातूनच तो आपसूक शिकत गेला असावा. त्याने चित्रिकरणावेळी एकाला ओळखलं आणि विचारलं अरे, तू त्या चित्रपटात होतास ना.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. नीरज चोप्राने १९ सप्टेंबरला जाहिरात शेअर करत ३६० डिग्री मार्केटिंग असं लिहिलं आहे. यानंतर ही जाहिरात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. नीरज चोप्राच्या चाहत्यांनी प्रोफेशनल अ‍ॅक्टरपेक्षा चांगली अ‍ॅक्टिंग केल्याचं सांगितलं आहे. तर काही जणांनी अभिनेत्यांचं करिअर संकटात असल्याचं सांगितलं आहे.

भारतीय सैन्य अधिकारी २३ वर्षीय नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत देशाला ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.