“माझ्या वक्तव्यांचा वापर…”; पाकिस्तानी खेळाडूने भालाचोरी केल्याच्या बातम्यांवरुन नीरज चोप्रा संतापला

कमेंट्स करण्याआधी खेळाचे नियम समजून घ्या, असंही तो म्हणाला आहे.

भारताचा गोल्डन मॅन अर्थात टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णपदक मिळवलेला नीरज चोप्रा याने नुकतंच आपला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या वक्तव्याचा गैरवापर करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. माझ्या वक्तव्यांना तुमच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी वापरु नका असं त्याने सुनावलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की माझ्या वक्तव्यांचा वापर आपल्या घाणेरड्या अजेंड्याचा प्रसार करण्यासाठी करु नये. खेळ आपल्या सर्वांना एकत्र राहायला शिकवतो. कमेंट्स करण्याआधी खेळाचे नियम समजून घ्या.


या ट्विटसोबत त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्याने देशवासीयांचे आभार मानले आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये पुढे तो म्हणतो, “मी मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं, की खेळाच्या वेळी भाला फेकण्यासाठी मी पाकिस्तानी खेळाडू नदीमकडून भाला घेतला. पण त्याला फार मोठा मुद्दा बनवण्यात आलं. खरंतर ही खूप साधी गोष्ट आहे. आपल्या व्यक्तिगत भाल्याचा वापर सर्व खेळाडू करु शकतात. तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात काही मोठी गोष्ट नाही. तो भाला घेऊन नदीम तयारी करत होता आणि माझ्या खेळावेळी मी त्याला तो भाला मागितला. यात काहीही वेगळं नाही. पण माझ्या माध्यमातून काही लोक हा खूप मोठा मुद्दा बनवत आहे. त्या सर्वांना माझी विनंती आहे की असं काही करु नका.”

कशाबद्दल बोलत आहे नीरज? येथे वाचा…

नीरजने ऑलिम्पिकचा किस्सा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला होता. तो म्हणाला होता, ”मी फायनल सुरू होण्यापूर्वी माझा भाला शोधत होतो. मला तो मिळत नव्हता. अचानक मला अर्शद नदीम माझा भाला घेऊन चालताना दिसला. मी त्याला म्हणालो, ”भाऊ हा माझा भाला आहे, मला दे. मला आता तो फेकायचा आहे. मग त्याने तो मला परत दिला. तेव्हाच तुमच्या लक्षात आले असेल की मी माझा पहिला थ्रो घाईत केला.”

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neeraj chopra post video urges not spread propaganda over his remark regarding arshad nadeem vsk

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी