नवी दिल्ली : भारताला ऑलिम्पिकमध्ये दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया यांच्यासह ११ क्रीडापटूंची देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेन, हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि कसोटी क्रिकेट कर्णधार मिताली राज यांच्या नावांचीही निवड समितीने शिफारस केली आहे. सुनील छेत्री हा या पुरस्कारासाठी निवड झालेला पहिला फुटबॉलपटू आहे. सन्मानचिन्ह आणि २५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

गतवर्षी पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार प्रदान केला होता, तर २०१६मध्ये चौघांची पुरस्कारासाठी निवड झाली होती. पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धामधील पदकविजेत्यांचा सन्मान करता यावा म्हणून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड प्रक्रिया लांबणीवर टाकली होती. हॉकी प्रशिक्षक संदीप सांगवान तसेच अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक राधाकृष्ण नायर आणि टी. पी. ऑसेफ यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

३५ क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने ३५ क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. गतवर्षीपेक्षा आठ अधिक क्रीडापटूंना यंदा हा पुरस्कार दिला जाणार आहे. सन्मानचिन्ह आणि १५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

क्रिकेटपटू शिखर धवन, महिला हॉकीपटू वंदना कटारिया, पॅरा-टेबल टेनिसपटू भाविना पटेल, पॅरा-बॅडमिंटनपटू सुहास यथिराज, उंच उडीपटू निशाद कुमार यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. धवन हा अर्जुन पुरस्कार मिळवणारा ५७वा क्रिकेटपटू आहे. ऐतिहासिक ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या सर्व पुरुष हॉकीपटूंचीही (पूर्वविजेते मनप्रीत सिंग आणि श्रीजेश वगळून) अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

’  अर्जुन पुरस्कार विजेते : मनप्रीत सिंग, पीआर श्रीजेश वगळता हॉकी पुरुष ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघातील खेळाडू, शिखर धवन (क्रिकेट), अरपिंदर सिंग (अ‍ॅथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), अभिषेक वर्मा (नेमबाजी), संदीप नरवाल (कबड्डी), अंकिता रैना (टेनिस) दीपक पुनिया (कुस्ती), भाविना पटेल (टेबल टेनिस), योगेश कथुनिया (थाळीफेक), निषाद कुमार (उंचउडी), प्रवीण कुमार (उंच उडी) शरद कुमार (उंच उडी), सुहास यथिराज (बॅडमिंटन), सिंहराज अधाना (नेमबाजी), हरविंदर सिंग (तिरंदाजी)

  खेलरत्न पुरस्कार विजेते : नीरज चोप्रा (अ‍ॅथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पी. आर. श्रीजेश (हॉकी), लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (बॅडमिंटन), अवनी लेखारा, मनीष नरवाल (नेमबाजी), कृष्णा नागर (बॅडमिंटन), सुमित अँटिल (अ‍ॅथलेटिक्स)