Why Nepal Was not part of Asia Cup 2025: आशिया चषक आणि वादविवादांची राळ शमण्याआधीच युएईत नेपाळ आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी२० मालिका सुरू झाली. वेस्ट इंडिजचा संघ सहज विजय मिळवेल असं चित्र होतं मात्र घडलं भलतंच. क्रिकेटच्या पटलावर नव्याने दाखल झालेल्या नेपाळने वेस्ट इंडिजला पराभवाचा दणका देत ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात छोट्या फरकाने विजय मिळवणाऱ्या नेपाळने दुसऱ्या लढतीत वेस्ट इंडिजला तब्बल ९० धावांनी हरवण्याची किमया केली. या विजयासह नेपाळने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम लढतीत मात्र वेस्ट इंडिजने लौकिकाला साजेसा खेळ करत नेपाळचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला. वेस्ट इंडिजने दणदणीत विजय मिळवत इभ्रत राखली मात्र मालिका पराभवाने नामुष्की ओढवली ती भरून निघणारी नाही.

नेपाळ-वेस्ट इंडिजचे संघ या मालिकेसाठी युएईत दाखल झाले तेव्हा तिथे आशिया चषकाचे सामने सुरू होते. आशिया उपखंडाचा अविभाज्य भाग असूनही नेपाळचा संघा या स्पर्धेत खेळत नव्हता. वेस्ट इंडिजसारख्या कसोटी खेळणाऱ्या देशाला हरवण्याची ताकद असलेला नेपाळचा संघ आशिया चषकात का नव्हता असा प्रश्न चाहत्यांना पडणं साहजिक आहे. त्याचं उत्तर जाणून घेऊया.

आशिया चषकासाठी पात्र होण्यासाठी आशियाई क्रिकेट काऊंसिलतर्फे आयोजित प्रीमिअर कप स्पर्धेत चांगली कामगिरी करणं अपेक्षित होतं. नेपाळचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला पण त्यांना दमदार कामगिरी करता आली नाही. प्राथमिक गटात नेपाळच्या संघाने अव्वल स्थान राखले पण सेमी फायनलमध्ये युएईविरुद्ध ते पराभूत झाले. थर्ड प्लेस प्लेऑफच्या लढतीत हाँगकाँगने त्यांना नमवलं. शेवटच्या षटकापर्यंत हा सामा रंगला होता. मोठ्या सामन्यांमध्ये नेपाळला कामगिरी उंचावता आली नाही.

प्राथमिक फेरीच्या लढतीत नेपाळने मलेशियाला ५ विकेट्सनी नमवलं. पुढच्या लढतीत कतारवर ३२ धावांनी विजय मिळवला. विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करत नेपाळने हाँगकाँगवर ८ विकेट्सनी मात केली. हाच फॉर्म कायम राखत त्यांनी सौदी अरेबियावर ६ विकेट्सने विजय मिळवला. पहिल्या सेमी फायनलच्या लढतीत मात्र नेपाळचा अनुभव कमी पडला. नेपाळला प्रथम फलंदाजी करताना ११९ धावांचीच मजल मारता आली. सुंदीप जोराने ५० धावांची खेळी केली. युएईकडून जुनैद सिद्दीक, अली नासर आणि बासिल अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. युएईने ४ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. अलिशान सराफूने ४१ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. विष्णू सुकुमारनने २८ धावा करत त्याला चांगली साथ दिली.

थर्ड प्लेस प्लेऑफच्या लढतीत हाँगकाँगने नेपाळवर ४ विकेट्सनी विजय मिळवला. या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा युएईचा संघ, उपविजेता ओमान आणि थर्ड प्लेस विजेते हाँगकाँग यांना भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या बरोबरीने आशिया चषकात खेळण्याची संधी मिळाली. प्राथमिक फेरीतला फॉर्म नेपाळला कायम राखता आला नाही. आशिया चषक खेळण्याची नेपाळची संधी थोडक्यात हुकली होती.

पहिल्या सामन्यात चमत्कार

वेस्ट इंडिजचा कर्णधार अकेलने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेपाळची सुरुवात चांगली झाली नाही पण कर्णधार रोहित पौडेलने ३८ तर कुशल मल्लाने ३० धावांची खेळी केली. या दोघांनी भागीदारी करत नेपाळच्या डावाला आकार दिला. गुलशन झा याने २२ तर दिपेंद्र सिंग अरी यांनी १७ धावांचं योगदान दिलं. या चौघांनंतर नेपाळची पुन्हा घसरगुंडी उडाली आणि त्यांनी २० षटकात १४८ धावांची मजल मारली. अनुभवी जेसन होल्डरने २० धावांत ४ विकेट्स पटकावल्या. पदार्पणवीर नवीन बिडाइसने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अनुभवी काईल मेयर्स ५ धावा करुन तंबूत परतला. आमिर जंगू आणि अकीम ऑगस्ट यांनी डाव सावरला. नंदन यादवने अकीमला बाद केलं. पौडेलने जोएल अँड्यूला माघारी धाडलं. ललित राजबंक्षीने जंगूला बाद करत महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. उत्तम फॉर्मात असणारा केसी कार्टी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. ५ बाद ६८ या स्थितीतून नवीन आणि होल्डर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुश भुर्टेलने होल्डरला बाद करत वेस्ट इंडिजला अडचणीत आणलं. भुर्टेलच्या बॉलिंगवर नवीन हिट विकेट झाला. त्याने अडखळत २२ धावा केल्या. कर्णधार अकेल होसेनने षटकारासह सुरुवात केली. फॅबिअल अॅलन आणि त्याने मिळून १८व्या षटकात १९ धावा चोपून काढल्या. मात्र १९व्या षटकात करण केसीने होसेनला बाद केलं. त्याने ९ चेंडूत १८ धावा केल्या. केसीने १९व्या षटकात शिस्तबद्ध मारा करत अवघ्या २ धावा देत विकेटही पटकावली.

शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी २८ धावांची आवश्यकता होती. फॅबिअनने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरही त्याने चौकार वसूल केला. मात्र यानंतरचा चेंडू निर्धाव पडला. पाचव्या चेंडूवरही फॅबिअनला एकही धाव घेता आली नाही. सहाव्या चेंडूवर फॅबिअनने जोरकस फटका लगावला पण भुर्टेलने सीमारेषेवर अफलातून झेल टिपला आणि नेपाळच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. नेपाळने १९ धावांनी हा मुकाबला जिंकला.

नेपाळच्या क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक मालिका विजय

शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी २८ धावांची आवश्यकता होती. फॅबिअनने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरही त्याने चौकार वसूल केला. मात्र यानंतरचा चेंडू निर्धाव पडला. पाचव्या चेंडूवरही फॅबिअनला एकही धाव घेता आली नाही. सहाव्या चेंडूवर फॅबिअनने जोरकस फटका लगावला पण भुर्टेलने सीमारेषेवर अफलातून झेल टिपला आणि नेपाळच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. नेपाळने १९ धावांनी हा मुकाबला जिंकला.

नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आसिफ शेख (६८) आणि सुंदीप जोरा (६३) या जोडगोळीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. आसिफने ८ चौकार आणि २ षटकारांसह ४७ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली. सुंदीपने ३९ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावांची खेळी साकारली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६६ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजतर्फे काईल मेयर्स आणि अकेल होसेन यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना, वेस्ट इंडिजने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. मोहम्मद आदील आलमने २४ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या डावाला खिंडार पाडलं. काईल मेयर्स या अनुभवी शिलेदाराकडून वेस्ट इंडिजला मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र तो अवघ्या ६ धावा करून तंबूत परतला. केसी कार्टी यंदाच्या वर्षात उत्तम फॉर्मात आहे मात्र या लढतीतही तो अपयशीच ठरला. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डर या संघात आहे मात्र तो फलंदाजी किंवा गोलंदाजीत काहीही चमकदार कामगिरी करू शकला नाही. पहिल्या लढतीत फॅबिअन अॅलनने झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र या लढतीत तोही अपयशी ठरला. वेस्ट इंडिजचा डाव ८० धावांतच आटोपला. कुशल भुर्टेलने ३ विकेट्स घेतल्या.

तिसऱ्या लढतीत वेस्ट इंडिज पूर्वपदावर

नवख्या नेपाळविरुद्ध मालिका गमावण्याची नामुष्की ओढवलेल्या वेस्ट इंडिजने तिसऱ्या सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने तिसऱ्या लढतीत टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. रामोन सिमंड्सच्या ४ विकेट्सच्या बळावर वेस्ट इंडिजने नेपाळचा डाव १२२ धावांतच गुंडाळला. नेपाळतर्फे सलामीवीर कुशल भुर्टेलने ३९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून सिमंड्सने १५ धावांतच ४ विकेट्स घेतल्या. आमिर जंगू (७४) आणि अकीम ऑगस्ट (४१) यांनी १२३ धावांची दमदार सलामी देत वेस्ट इंडिजला दमदार विजय मिळवून दिला. सिमंड्सला सामनावीर तर मालिकेत ४७ धावा आणि ५ विकेट्स पटकावणाऱ्या कुशल भुर्टेलला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.