क्रिकेटच्या पटलावर नुकतंच पाऊल ठेवणाऱ्या नेपाळने शारजा इथे झालेल्या दुसऱ्या टी२० लढतीत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा नमवण्याची किमया केली. या विजयासह नेपाळने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. नेपाळविरुद्ध मालिका असल्यामुळे वेस्ट इंडिज बोर्डाने या मालिकेसाठी दुय्यम अनुनभवी संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे नेपाळने मात्र दमदार सांघिक खेळ करत ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला. नेपाळने १७३ धावांची मजल मारली. वेस्ट इंडिजला हे आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा डाव ८३ धावांतच गडगडला.
नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आसिफ शेख (६८) आणि सुंदीप जोरा (६३) या जोडगोळीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. आसिफने ८ चौकार आणि २ षटकारांसह ४७ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली. सुंदीपने ३९ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावांची खेळी साकारली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६६ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजतर्फे काईल मेयर्स आणि अकेल होसेन यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना, वेस्ट इंडिजने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. मोहम्मद आदील आलमने २४ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या डावाला खिंडार पाडलं. काईल मेयर्स या अनुभवी शिलेदाराकडून वेस्ट इंडिजला मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र तो अवघ्या ६ धावा करून तंबूत परतला. केसी कार्टी यंदाच्या वर्षात उत्तम फॉर्मात आहे मात्र या लढतीतही तो अपयशीच ठरला. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डर या संघात आहे मात्र तो फलंदाजी किंवा गोलंदाजीत काहीही चमकदार कामगिरी करू शकला नाही. पहिल्या लढतीत फॅबिअन अॅलनने झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र या लढतीत तोही अपयशी ठरला. वेस्ट इंडिजचा डाव ८० धावांतच आटोपला. कुशल भुर्टेलने ३ विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिजचा दुसरा संघ भारतात कसोटी मालिकेसाठी दाखल होणार आहे. भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका २ तारखेपासून सुरू होत आहे. अहमदाबाद आणि दिल्ली इथे हे सामने होणार आहेत. वेस्ट इंडिज संघासमोर बलाढ्य भारतीय संघाचं आव्हान आहे. दुसरीकडे क्रिकेटच्या नकाशावर आता पाऊल ठेवणाऱ्या नेपाळविरुद्ध त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.