शक्ती आणि युक्तीचे अफलातून मिश्रण असलेल्या लढतीत नेदरलँड्सने ‘सॉकरूस’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान बाजूला सारत झुंजार विजय मिळवला. सामना संपल्याची शिट्टी वाजताच स्टेडियमधील हजारो ‘डच’ समर्थकांच्या जल्लोषाला उधाण आले. ऑस्ट्रेलियावर ३-२ विजयासह नेदरलँड्सने बाद फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली.
‘हवाहवाई’ आक्रमणाद्वारे स्पेनच्या बचावाला निष्प्रभ करणाऱ्या आर्येन रॉबेनने या लढतीतही नेदरलँड्सला झटपट आघाडी मिळवून दिली. मैदानाच्या मध्यभागापासून चेंडूला खेळवत रॉबेनने अफलातून गोल करताच स्टेडियममध्ये जमलेल्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. रॉबेनच्या कौशल्याचे कौतुक सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी खेळाडू टीम काहिलने पुढच्याच मिनिटाला थरारक गोल करत बरोबरी साधली. नेदरलँड्सच्या बचावपटूंना चकवत काहिलने चेंडू गोलपोस्टच्या दिशेने नेला. डाव्या पायाने त्याने ढकललेला चेंडू क्रॉसबारवर आदळून गोलपोस्टमध्ये विसावताच ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही.
दोनच मिनिटांत घडलेल्या या नाटय़मय कलाटणीने स्टेडियममध्ये उत्साहाला उधाण आले. टीम काहिलीला पिवळे कार्ड मिळाल्याने ऑस्ट्रेलियाच्या संघव्यवस्थापनाच्या समस्या वाढल्या. पण मध्यंतराला असलेली बरोबरी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिले जेडिनॅकने मोडून काढली. चिलेसनकडून मिळालेल्या पेनल्टी किकवर सहजपणे गोल साकारत जेडिनॅक ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. मात्र वेस्ले श्नायडरकडून मिळालेल्या पासवर रॉबीन व्हॅन पर्सीने अफलातून गोल साकारत बरोबरी करून दिली. आणखी काही मिनिटांत मेमफिस डीपेने ऑस्ट्रेलियाच्या मध्यरक्षकांना भेदत गोल करत नेदरलँड्सला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. नेदरलँड्सनी घेतलेली आघाडी भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण केले. मात्र नेदरलँड्सने चिवट बचाव करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2014 रोजी प्रकाशित
नेदरलँड्सचा निसटता विजय
शक्ती आणि युक्तीचे अफलातून मिश्रण असलेल्या लढतीत नेदरलँड्सने ‘सॉकरूस’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान बाजूला सारत झुंजार विजय मिळवला.
First published on: 19-06-2014 at 03:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netherlands beat australia 3 2 in fifa world cup