युरो पात्रता फुटबॉल स्पर्धा

नेदरलँड्स, जर्मनी आणि विश्वचषक उपविजेते क्रोएशिया हे संघ शनिवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. विश्वविजेते फ्रान्स, स्पेन, इटली आणि इंग्लंड हे संघ आधीच पात्र ठरले असून, पोर्तुगालचा संघ पात्रतेपासून एका विजयाच्या अंतरावर आहे.

२०१४ च्या विश्वचषकामध्ये तिसरे स्थान मिळवणाऱ्या नेदरलँड्सला युरो पात्रतेसाठी एका गुणाची आवश्यकता होती. त्यांनी बेलफास्ट येथे झालेल्या सामन्यात नॉर्दर्न आर्यलडला गोलशून्य बरोबरीत रोखले.

टॉनी क्रूसच्या दोन गोलच्या बळावर जर्मनीने बेलारूसचा ४-० असा धुव्वा उडवत सलग १३व्यांदा युरो स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. मथायस गिंटर आणि लीऑन गोरेत्झका यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

पहिल्या सत्रात पिछाडीवर पडलेल्या क्रोएशियाने दुसऱ्या सत्रातील शानदार खेळाच्या बळावर रिजेका येथे झालेल्या सामन्यात स्लोव्हाकियाला ३-१ असे नामोहरम केले. रॉबर्ट बोझेनिकने ३२व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे स्लोव्हाकियाला पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी मिळवता आली होती. परंतु उत्तरार्धात निकोला व्लासिक (५६ व्या मि.), ब्रुनो पेटकोव्हिच (६० व्या मि.) आणि इव्हान पेरिसिच (७४ व्या मि.) यांनी एकेक गोल करून क्रोएशियाला तारले.