काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा लिलाव झाला. यामध्ये बऱ्याच अनुभवी खेळाडूंना वगळून काही संघमालकांनी तरुण खेळाडूंना संधी दिली. आयपीएलच्या निमित्ताने होणाऱ्या या लिलावाकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिले होते. पण, न्यूझीलंड क्रिकेट प्लेअर्स असोसिएशनकडून मात्र या लिलावावर टीका करण्यात आली आहे. खेळाडूंचा लिलाव लावण्याची ही संपूर्ण प्रक्रिया अपमानास्पद असल्याचे मत या असोसिएशनकडून मांडण्यात आले आहे.

‘न्यूझीलंड हेराल्ड’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘खेळाडूंच्या दृष्टीने या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहिले तर ती एक अपमानास्पद बाब आहे. त्या लिलावामध्ये खेळाडूंना जगासमोर प्रदर्शनासाठी ठेवलेल्या गुरांप्रमाणे वागणूक दिली जात होती’, असे मत न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेथ मिल्स यांनी मांडले. लिलावासाठी एखाद्या खेळाडूची घोषणा होणं आणि त्याच्यावर किंमत न लावताच पुन्हा त्याचं नाव मागे घेतलं जाणं हे त्या खेळाडूच्या दृष्टीने अतिशय अपमानकारक असल्याचा मुद्दा यात अधोरेखित करण्यात आला.

पॅरालिम्पिकमधल्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्याचा गौरव, जाणून घ्या कोण आहेत मुरलीकांत पेटकर?

आयपीएलच्या हंगामासाठी लिलाव प्रक्रियेतून खेळाडूंच्या केल्या जाणाऱ्या निवडीवर नाराजी व्यक्त करणारे मिल्स पहिलेच नाहीत. याआधीही या सर्व प्रकारावर वेलिंग्टन क्रिकेट असोसिएशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर क्लिंटन यांनी नाराजीचा सूर आळवला होता. आयपीएलचा लिलाव म्हणजे अप्रतिष्ठीत, निष्ठुर आणि गरज नसतानाही गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरु असणारी एक अवाजवी प्रक्रिया आहे, असे मत त्यांनी मांडले होते. क्रिकेट विश्वात आयपीएलचे मोलाचे योगदान आहे. या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक होतकरु क्रिकेट खेळाडूंमध्ये उत्सुकताही पाहायला मिळते. पण, आपण कोणत्या संघातून खेळणार आहोत याची त्यांना कल्पनाच नसते आणि ही चांगली बाब नाही, अशी वेगळी बाजूही त्यांनी मंडली. तेव्हा आता आयपीएलचे पदाधिकारी या सर्व परिस्थितीवर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तुम्हाला हे माहितीये का?
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकूण ५७८ खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. बेन स्टोक्सवर या लिलावात १२.५ कोटींची सर्वाधिक बोली लावण्यात आली होती. तर भारतीय खेळाडूंमध्ये जयदेव उनाडकटवर सर्वात जास्त बोली लावण्यात आली होती.