अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिलने (५६ चेंडूंत ९३ धावा) केलेल्या झुंजार खेळीमुळे न्यूझीलंडने बुधवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत स्कॉटलंडचा १६ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

‘अव्वल-१२’ फेरीच्या या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडला ५ बाद १५६ धावाच करता आल्या. जॉर्ज मुन्सी (२२) आणि मॅथ्यू क्रॉस (२७) यांनी चांगली कामगिरी केली. मग अखेरच्या षटकांत मायकल लिस्कने (नाबाद ४२) फटकेबाजी करत स्कॉटलंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला इतरांची साथ लाभली नाही.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १७२ अशी धावसंख्या उभारली. एका बाजूने गडी बाद होत असताना सलामीवीर गप्टिलने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याला ग्लेन फिलिप्सची (३३) साथ लाभली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारी रचल्याने न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करता आली. गप्टिलच्या ९३ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद १७२ (मार्टिन गप्टिल ९३; सफयान शरीफ २/२८) विजयी वि. स्कॉटलंड : २० षटकांत ५ बाद १५६ (मायकल लिस्क नाबाद ४२; ट्रेंट बोल्ट २/२९)