इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांत लौकिकाला साजेशी कामगिरी अजिंक्य रहाणे आणि गौतम गंभीर या दोन्ही सलामीवीरांना करता आली नव्हती, त्यामुळे आगामी दोन सामन्यांसाठी संघ निवडताना एका सलामीवीराला वगळण्यात येईल असे म्हटले जात होते. पण निवड समितीने मात्र या दोघांवरही विश्वास ठेवत संघात कोणताही बदल केलेला नाही.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. यानंतर २३ जानेवारीला मोहालीमध्ये आणि २७ जानेवारीला धरमशाला येथे अनुक्रमे अखेरचे दोन सामने खेळवण्यात येतील. अखेरच्या दोन्ही सामन्यांसाठी संघात कोणताही बदल निवड समितीने केलेला नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या पत्रकात म्हटले आहे.
संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, शामी अहमद, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अमित मिश्रा आणि अशोक दिंडा.