वेगवान गोलंदाजीसाठी दिशा आणि टप्पा महत्त्वाचा आहेच. पण वेगाशी तडजोड कधीही करणार नसल्याचे मत भारताचा उदयोन्मुख गोलंदाज शामी अहमद याने व्यक्त केले आहे.
‘‘माझ्यासाठी वेग आणि ‘स्विंग’ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गोलंदाजीसाठी दिशा आणि टप्पा फार महत्त्वाचा असतो, पण त्यासाठी मी वेगाशी तडजोड करणार नाही. वेग हे माझे बलस्थान असून त्यामुळेच मी या स्तरावर पोहोचू शकलो आहे,’’ असे शामीने सांगितले.
पदार्पणाच्या सामन्यातच चार सलग निर्धाव षटके टाकत शामीने एक अनोखा विक्रम रचला, याबद्दल विचारल्यावर शामी म्हणाला की, ‘‘कर्णधाराने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावले होते, त्यानुसार मी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी ठरवून होत नाहीत, पण माझ्याबाबतीत या गोष्टी घडल्या आणि मी त्यासाठी आनंदी आहे. माझ्या क्षमतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्याचबरोबर अथक मेहनत घ्यायची माझी तयारीही आहे.’’
पाकिस्तानविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या सामन्यात शामीने पदार्पण केले. याविषयी तो म्हणाला की, ‘‘धावसंख्या कमी होती. पण धोनीने मला सांगितले की, निराश होऊ नकोस आणि आपल्या रणनीतीमध्ये बदल करू नकोस.’’
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर धोनी म्हणाला होता की, शामीकडे चांगला वेग असला तरी त्याच्यामध्ये अजून काही बदल व्हायला हवेत. याबद्दल विचारले असता शामी म्हणाला की, ‘‘रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा खेळत असताना मी बरेच काही शिकलो आहे, तुमच्याकडे संयम असायला हवा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्ही बरेच प्रयोग करता. पण कसोटी क्रिकेटमध्ये प्रयोग न करता संयमावर अधिकाधिक भर द्यायला हवा. फलंदाज चूक करेल, यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागते. धोनी, गंभीर, विराट, युवराज यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मी शिकलो आहे. त्यांच्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून बरेच काही शिकण्यासारखे असते.’’