तिरंदाजी हा प्राचीन प्रकार. युद्धात एकमेकांवर कुरघोडी साधण्यासाठी तिरंदाजीचा वापर केला जायचा. पण क्रीडाप्रकार म्हणून हा खेळ भारतात गेल्या काही वर्षांपासून विकसित होत आहे. मात्र भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या तिरंदाजीबाबत बहुतांशी जण अनभिज्ञच आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय तिरंदाज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. लंडन ऑलिम्पिकमध्येही भारतीय तिरंदाज सहभागी झाले होते. पण तिरंदाजी या खेळाला अद्याप ओळख मिळाली नसल्याचे उद्गार अर्जुन पुरस्कारप्राप्त युवा तिरंदाज दीपिका कुमारीने काढले.
‘‘आम्ही तिरंदाजपटू आहोत असे सांगितल्यावर आम्ही नक्की काय करतो, हे आम्हाला समजावून सांगावे लागते. हा एक नियमांच्या चौकटीत बांधलेला शिस्तबद्ध खेळ आहे, याची जाणीव त्यांना करून द्यावी लागते. आपण ज्या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतो, त्याबद्दल माहितीच नसावी याची खंत वाटते,’’ असे दीपिकाने सांगितले. नुकत्याच शांघाय येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत दीपिकाने रिकव्‍‌र्ह प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ संस्थेतर्फे दीपिका कुमारी आणि जयंत तालुकदार या तिरंदाजपटूंना आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.
ती म्हणाली, ‘‘लंडन ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न साकारता आले नाही, याची खंत आहे. मात्र आमच्या तयारीमध्येच कमतरता राहिली होती, असे जाणवते. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आमचे सामने झाले. ऑलिम्पिकसाठी आम्ही कोलकात्यात सराव केला. लंडन आणि कोलकातामधील वातावरणात जवळपास १७-१८ अंश सेल्सिअसचा फरक पडल्याने लंडनमध्येच दाखल होताच अनेकजण तापाने आजारी पडलो. तापाने अशक्तपणा आल्यामुळे धनुष्य उचलतानाही त्रास होत होता. त्यात लंडनमधल्या लहरी वाऱ्याचाही आम्हाला फटका बसला. ऑलिम्पिक हे सर्वोच्च जागतिक व्यासपीठ आहे. त्यासाठी साजेशी तयारी करण्यातच आम्ही कमी पडलो. मात्र हा अनुभव खूप काही शिकवणारा होता. कोरियन तिरंदाजपटूंकडून नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. या अपयशाने पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी बळ मिळाले आहे.’’
‘‘तिरंदाजी हा खर्चिक खेळ आहे, त्यामुळे सरकारचे आर्थिक साहाय्य तसेच प्रशिक्षणासाठी आणखी अकादमी निर्माण झाल्यास गुणवान तिरंदाज तयार होऊ शकतील. ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’सारख्या संस्थेमुळे युवा तिरंदाजांना आगेकूच करणे सोपे जाईल.
शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर या खेळाचा समावेश करायला हवा. तिरंदाजीच्या राष्ट्रीय स्पर्धाच्या वेळी प्रेक्षकांसाठी नीट व्यवस्था झाल्यास खेळाविषयीची जागरुकता वाढू शकते,’’ असे दीपिकाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No sports identity of archery game deepika
First published on: 01-06-2013 at 03:53 IST