युवराज सिंग व उन्मुक्त चंद यांनी केलेल्या दमदार नाबाद अर्धशतकांमुळेच उत्तर विभागाने देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. त्यांनी मध्य विभागास आठ विकेट राखून पराभूत केले.
उत्तर विभागाचा कर्णधार गौतम गंभीर याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अमित मिश्रा (३/५०) व रजत पालिवाल (२/१४) यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे मध्य विभागाचा डाव ४१.५ षटकांत १९० धावांमध्ये कोसळला. मध्य विभागाकडून अशोक मणेरिया याने ३४ धावा करीत एकाकी लढत दिली. खराब हवामानामुळे उत्तर विभागापुढे ३३ षटकांत १६० धावांचे आव्हान ठेवण्यात आले. युवराज (नाबाद ७७) व उन्मुक्त (नाबाद ५६)यांनी १२९ धावांची अखंडित भागीदारी करीत संघास १९ चेंडू बाकी असतानाच विजय मिळवून दिला. युवराजने नऊ चौकार व तीन षटकार अशी आतषबाजी केली. उनमुक्त याने पाच चौकार मारले.