नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे खापर माजी कर्णधार सौरव गांगुली याने संघ व्यवस्थापनावर फोडले असतानाच आता माजी क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही संघाबाबतच्या काही विशिष्ट निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निर्णायक सामन्यात लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले नाही. युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंशी वागण्याची ही काय रित झाली का? असा संतप्त सवाल त्याने केला आहे.

राहुलने मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात विजयी खेळी केली. पण केवळ एका खराब खेळीमुळे राहुलला संघातून डावलले गेले, ही गोष्ट मला खटकली. जर एखाद्या दुखापतीमुळे खेळाडूला संघातून वगळण्यात आले असेल, तर मी समजू शकतो. पण राहुल केवळ एका सामन्यात चांगला खेळ करू शकला नाही आणि त्याला संघातून बाहेर करण्यात आले. पहिल्या सामन्यात राहुल नाबाद राहिला होता हे विसरून त्याला संघाबाहेर करणे, हे चुकीचे आहे. ही युवा खेळाडूंशी वागण्याची पद्धत झाली का?, असा सवाल त्याने केला.

युवा खेळाडूंनी चांगला खेळ करणे गरजेचे आहे. तो विश्वास संघ व्यवस्थापनाने त्यांच्यात निर्माण करायला हवा. पण तसे न करता हे व्यवस्थापन या खेळाडूंना संघाबाहेर करत आहे, अशी टीका त्याने केली.

दरम्यान, भारताच्या वरच्या फळीतील पहिले ४ फलंदाज हे कायम सर्वोकृष्ट असले पाहिजेत. राहुल आणि अजिंक्य हे दोघे भारताचे उत्तम फलंदाज आहेत. या दोघांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर स्थान दिले तर संघाची फलंदाजीची बाजू निश्चितच भक्कम होईल, असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.