हॉकी इंडिया लीगच्या पावलावर पाऊल टाकत आता आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) हॉकी खेळामध्ये बदल करण्याचे ठरवले असून ३५ मिनिटांच्या दोन सत्रांऐवजी आता १५ मिनिटांच्या चार सत्रांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे सामन्याचा कालावधी ७० वरून ६० मिनिटांवर आला आहे. पेनल्टी-कॉर्नर आणि गोल झाल्यानंतर ‘टाइम-आऊट’ दिला जाणार आहे.
पहिल्या आणि तिसऱ्या सत्रानंतर दोन मिनिटांचा अवधी दिला जाणार असून दुसऱ्या सत्रानंतर १० मिनिटांची विश्रांती कायम ठेवण्यात आली आहे. लुसाने येथे झालेल्या एफआयएचच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. ‘‘सामना अधिकाधिक रंजक करण्यासाठी तसेच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. बास्केटबॉल, अमेरिकन फुटबॉल आणि नेटबॉलप्रमाणेच हॉकी हा खेळ आता चार सत्रांमध्ये खेळवण्यात येणार आहे,’’ असे एफआयएचच्या पत्रकात म्हटले आहे. नवे नियम १ सप्टेंबरपासून अमलात येणार असून ३१ मे ते १५ जूनदरम्यान होणारी विश्वचषक हॉकी स्पर्धा जुन्या नियमांनुसारच खेळवली जाईल.
नवे नियम चॅम्पियन्स चषक, जागतिक लीग दुसरी फेरी, जागतिक लीग उपांत्य आणि अंतिम फेरी तसेच ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या स्पर्धा आणि २०१६ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान लागू असतील. पेनल्टी-कॉर्नरदरम्यान आणि गोल झाल्यानंतर प्रत्येकी ४० सेकंदाचा टाइम-आऊट दिला जाणार आहे, असे एफआयएचचे अध्यक्ष लिआंड्रो नेग्रे यांनी सांगितले.