भारताने पुरुषांच्या हॉकीत व कुस्तीमध्ये बऱ्याच कालावधीनंतर सोनेरी कामगिरी केली असली, तरी गतवेळच्या तुलनेत भारताची पदकांची संख्या कमी झाली. त्यातही नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, ग्रीकोरोमन कुस्ती यामधील पीछेहाट म्हणजे आगामी कालवधीच्या दृष्टीने आत्मपरीक्षणाची वेळ आता भारतावर आली आहे. दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई स्पर्धेत यंदा भारताने ११ सुवर्ण, नऊ रौप्य व ३७ कांस्य अशी एकूण ५७ पदकांची कमाई केली. गतवेळी २०१० मध्ये गुआंगझुओ (चीन) येथे झालेल्या स्पर्धेत भारतास १४ सुवर्ण, १७ रौप्य व ३४ कांस्य अशी एकूण ६५ पदके मिळविली होती. आशियाई स्तरावर चीन, जपान, कोरिया यांच्याखालोखाल क्रीडा महासत्ता म्हणजे भारताची ओळख होती मात्र आता बहारिन, कझाकिस्तान, इराण, थायलंड, उत्तर कोरिया या देशांचे खेळाडूही भारताच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी करू लागले आहेत, ही भारतासाठी धोक्याची घंटाच आहे.
भारतीय पदकविजेत्यांमध्ये अॅथलेटिक्स, कुस्ती, नेमबाज आदी खेळांचा नेहमीच मोठा वाटा असतो. यंदा अॅथलेटिक्समध्ये भारतास १३ पदके तर नेमबाजीत नऊ पदकांवर समाधान मानावे लागले आहे. अॅथलेटिक्स हा खेळ नेहमीच पदकांची लयलूट करण्याचा खेळ मानला जातो. मात्र त्यामध्ये भारतास फक्त दोन सुवर्ण व तीन रौप्यपदके मिळाली. सीमा पुनिया हिने कृष्णा पुनिया या गतविजेत्या खेळाडूला मागे टाकून थाळीफेकीत सुवर्णपदक जिंकले. सीमा हिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अनेक वेळा उत्तेजक औषधे सेवनाचे आरोप व तंदुरुस्तीची समस्या आदी अनेक अडचणींवर मात करीत तिने हे यश मिळविले आहे. महिलांची ४ बाय ४०० मीटर रिले शर्यत हा भारतासाठी नेहमीच वर्चस्व गाजविण्याचा क्रीडा प्रकार आहे. लागोपाठ चौथ्यांदा भारताने ही शर्यत जिंकली. मात्र सोनेरी कामगिरीची अपेक्षा असलेल्या विकास गौडा, टिंटू लुका यांना रौप्यपदक मिळाले. मायुखा जॉनी हिच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंना आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीइतकीही कामगिरी येथे करता आलेली नाही. अॅथलेट्सना आता भरपूर सुविधा, परदेशी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण, अर्थार्जनाची हमी आदी भरपूर सवलती मिळत असतानाही त्यांच्याकडे पदक मिळविण्याची इच्छाशक्ती दिसत नाही.
बॅडमिंटनमध्ये निराशा
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे बॅडमिंटनपटू अनेक स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करीत असतानाही भारतास केवळ एकाच पदकाची नामुष्की पाहावी लागली. महिलांच्या सांघिक विभागात भारतास कांस्यपदक मिळाले. पदकासाठी हुकमी खेळाडू मानल्या गेलेल्या सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंना लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. परदेशातील स्पर्धामधील सहभाग व भारतात परदेशी खेळाडूंबरोबर होणाऱ्या स्पर्धा आदी अनेक जमेच्या बाजू असूनही भारताने सपशेल निराशा केली.
जलतरणातील एक पदक म्हणजे ‘डोंगर पोखरून..’ अशीच काहीशी अवस्था भारताबाबत दिसून येते. जलतरण, कलात्मक जलतरण, वॉटरपोलो या तीन क्रीडा प्रकारांचा विचार केला, तर सव्वाशेपेक्षा जास्त पदके जिंकण्याची संधी असते. मात्र संदीप शेजवळ याने मिळविलेल्या एकमेव कांस्यपदकाचा अपवाद वगळता भारतीय जलतरणपटू रिकाम्या हातानेच मायदेशी परतले असेच म्हणावे लागेल. भारतीय खेळाडूंना नोकरीची हमी आहे, अनेक सुविधा व सवलती मिळत आहेत असे असूनही पदक मिळविण्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती त्यांच्याकडे दिसून येत नाही. केवळ गल्लोगल्ली स्पर्धा आयोजित करून खेळाडू घडत नाही, खेळाडूंचा गुणात्मक विकास घडविणे अधिक महत्त्वाचे आहे हे जलतरण संघटक व प्रशिक्षकांनी लक्षात घेण्याची वेळ आली आहे.
बॉक्सिंगबाबत कोणीही यावे आणि थप्पड मारून जावे अशीच भारतीय खेळाडूंची अवस्था झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर असलेली जगजाहीर भांडणे ही नेहमीच खेळाडूंसाठी त्रासदायक ठरली आहेत. मात्र खेळाडूंचे तिकडे काहीही होवो आम्ही आमची सत्ता कशी राहील याचाच अधिक विचार करणार अशीच त्यांची वृत्ती दिसून येते. भारताची सरिता देवीने आपल्यावर पक्षपातीपणामुळे झालेला अन्याय दूर करण्यासाठी बॉक्सिंग संकुलात टाहो फोडला, त्या वेळी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे दोन वरिष्ठ पदाधिकारी तेथे उपस्थित होते. त्यांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली. ज्या वेळी सरिता त्यांच्याकडे मदतीसाठी धावली, तेव्हा तर भेकडपणे हे पदाधिकारी संकुलाबाहेर गेले. यापेक्षा आणखी दुर्दैव असूच शकत नाही. भारताची सुपरमॉम मेरी कोम हिने मिळविलेले सुवर्णपदक ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
हॉकीतील पुरुषांच्या गटात सुवर्णपदक आणि तेही अंतिम लढतीत पाकिस्तानला पराभूत करीत मिळविलेले विजेतेपद ही भारतासाठी सुवर्णअध्यायांची नांदीच आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे आता केवळ तेथे सुवर्णपदक मिळविण्यासाठीच नियोजन व सराव केला पाहिजे. कबड्डीत दोन्ही गटात भारताने सुवर्णपदक मिळविले नसते तरच नवल वाटले असते मात्र दोन्ही गटांत इराणच्या खेळाडूंनी भारतास विजयासाठी झुंजविले हा भारतासाठी इशाराच आहे. स्क्वॉशमधील ऐतिहासिक सुवर्णपदक, तसेच दीपिका पल्लिकल हिचे कांस्य व सौरव घोशालचे रौप्यपदक ही कौतुकास्पद कामगिरी आहे. नेमबाजी, टेनिस व तिरंदाजी मधील मर्यादित यश ही निश्चितच काळजी करण्याजोगी गोष्ट आहे. फुटबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल आदी सांघिक खेळांमध्ये पदकांची अपेक्षा नव्हतीच. पुढच्या आशियाई स्पर्धेसाठी भरपूर वेळ आहे. त्याआधी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची सत्त्वपरीक्षा आहे. या परीक्षेत भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, याचेच औत्सुक्य आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2014 रोजी प्रकाशित
आता आत्मपरीक्षणाची गरज!
भारताने पुरुषांच्या हॉकीत व कुस्तीमध्ये बऱ्याच कालावधीनंतर सोनेरी कामगिरी केली असली, तरी गतवेळच्या तुलनेत भारताची पदकांची संख्या कमी झाली.

First published on: 05-10-2014 at 02:55 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now time for introspection after asian games