‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांचा भारतीय खेळाडूंना सल्ला

टोक्यो ऑलिम्पिकच्या संयोजकांकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंसाठी काही अयोग्य असे निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र अतिरिक्त आव्हानांसाठी सज्ज राहून टोक्योमध्ये यश मिळवायचे असेल तर अयोग्य निर्बंधावर मात करावी लागेल, असा सल्ला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय खेळाडूंना दिला आहे.

‘‘खेळाडूंचा सराव तसेच आहाराच्या व्यवस्थेसह अन्य काही गोष्टींबाबत अद्याप आम्ही संयोजकांकडून स्पष्टीकरणाची प्रतीक्षा करत आहोत. त्यामुळे सद्यपरिस्थिती जाणून घेत भारतीय खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या सज्ज राहायला हवे. यावर कोणताही तोडगा काढता येणार नसून भारतीय खेळाडूंनी त्यावर मात करायला हवी,’’ असे बत्रा यांनी सांगितले.

भारतासहित ११ देशांकडून करोनाचा फैलाव वेगाने होईल, अशी भीती जपान सरकारला वाटत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना टोक्योला रवाना होण्याच्या सात दिवसआधी करोना चाचणी करवून घेणे बंधनकारक असून जपानमध्ये दाखल झाल्यानंतरही तीन दिवसांच्या कठोर विलगीकरणाला सामोरे जावे लागणार आहे. ‘‘विलगीकरणाच्या निर्बंधांबाबत अद्यापही चर्चाविनिमय सुरू आहे. संयोजन समिती पूर्ण सहकार्य आणि मदत करीत आहे. करोनाच्या बाबतीत प्रत्येक देशासाठी वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत,’’ असेही बत्रा म्हणाले.

बाख ८ जुलैला टोक्योत दाखल होणार

टोक्यो : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख हे ८ जुलै रोजी टोक्योमध्ये दाखल होणार आहेत. तीन दिवसांच्या विलगीकरणानंतर त्यांच्या टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीसोबत बैठका  होतील. बाख हे १६ जुलै रोजी हिरोशिमाला भेट देण्याची शक्यता आहे. बाख यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर टोक्योमधील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.