ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी जगभरातील अव्वल खेळाडू सज्ज झालेले असतात. पण एकामागून एक पदके पटकावत असताना या खेळाडूंची तुलना करण्यात काही जण दंग आहेत. पण खेळाडूंची तुलना करावी का आणि तुलना करून हाती नेमके काय लागते, असे प्रश्न पडतात. पण तुलना करण्यापेक्षा आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये अद्भुत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या अतुलनीय कामगिरीला नक्कीच कुर्निसात करायला हवा. या ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणारा अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स चर्चेचा विषय ठरला आहे. वेगाचा अनभिषिक्त सम्राट उसेन बोल्टही नवा विश्वविक्रम रचण्यासाठी सज्ज आहे. अशाच काही महान खेळाडूंवर दृष्टिक्षेप टाकण्याचा हा एक प्रयत्न.
मायकेल फेल्प्स
‘गोल्ड फिश’ या नावाने जगप्रसिद्ध असणाऱ्या फेल्प्सने आतापर्यंत तब्बल २२ सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये पटकावलेले हे सर्वाधिक सुवर्णपदके आहेत. लंडन ऑलिम्पिकनंतर निवृत्ती स्वीकारलेला फेल्प्स पुन्हा एकदा तलावात उतरला आणि या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत चार सुवर्ण त्याने आपल्या नावावर केली आहेत.
लारिसा लॅटिनिना
आतापर्यंतची जगातील सर्वोत्तम जिम्नॅस्टिकपटू असा मान पटकावला आहे तो लारिसा लॅटिनिना या सोव्हिएत रशियाच्या खेळाडूने. ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत लारिसा यांनी १८ पदके पटकावली आहे, यामधील १४ वैयक्तिक प्रकारातील आहेत. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी एकूण ९ सुवर्णपदकांची कमाई केली होती.
निकोलाई अँड्रिएनोव्ह
आतापर्यंत पुरुषांमधील सर्वोत्तम जिम्नॅस्टिकपटू ठरलेल्या सोव्हिएत रशियाचे निकोलाई अँड्रिएनोव्ह यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये १५ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये सात सुवर्णपदकांचा समावेश आहे. १९७६च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी चार सुवर्णपदके जिंकली होती. लयबद्ध जिम्नॅस्टिकमध्ये पुरुष विभागात सर्वाधिक पदके त्यांच्या नावावर आहेत.
कार्ल लुइस
धावण्याबरोबर लांब उडी स्पर्धेत अमेरिकेच्या कार्ल लुईस यांनी आपले स्थान निर्माण केले होते. त्यांनी १५ वेळा १०० मी. र्शयत १० सेकंदांमध्ये पूर्ण केली होती, तर २०० मी. शर्यत १० वेळा २० मिनिटांमध्ये पूर्ण केली होती. चार ऑलिम्पिकमध्ये त्यांनी १० पदके पटाकवली आहेत, यामध्ये ९ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
मार्क स्पिट्स
ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये तब्बल ३६ वर्षे विक्रम कायम ठेवण्याचा मान अमेरिकेचे जलतरणपटू मार्क स्पिट्स यांनी मिळवला होता. त्यांचा विक्रम नंतर फेल्प्सने २००८ साली मोडीत काढला. म्युनिकमध्ये झालेल्या १०७२च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सात सुवर्णपदके पटकावली होती. दोन ऑलिम्पिकमध्ये ११ पदके त्यांच्या नावावर आहेत.
पाव्हो नुर्मी
पाव्हो नुर्मी यांच्या निधनाच्या ४३ वर्षांनंतरही धावण्याच्या शर्यतीत अजूनही यांचे नाव घेतले जाते. विसाव्या शतकात त्यांनी ‘फ्लाइंग फिन’ या नावाने ओळखले जायचे. १० हजार मी., क्रॉस कंट्री स्पर्धामध्ये त्यांची कामगिरी वाखाडण्याजोगी होती. तीन ऑलिम्पिमध्ये त्यांच्या नावावर ९ सुवर्ण आणि तीन रौप्यपदके आहेत.
जिम थॉर्प
ऑलिम्पिकमधले अष्टपैलू खेळाडू म्हणून जिम थॉर्प यांच्यी ख्याती होती. फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल यांच्यासह बऱ्याच खेळांमध्ये त्यांचा सहभाग होता. विसाव्या शतकातील महान खेळाडू, असा त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९१२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पेंटॅथलॉन आणि डिकॅथलॉन या स्पर्धामध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते.
नाडिया कोमॅन्सी
सर्वात अचूक महिला जिम्नॅस्टिकपटू म्हणून नाडिया कोमॅन्सी यांचे नाव अजूनही घेतले जाते. १९७६ साली १४व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आणि १० पैकी १० गुण मिळवीत विश्वविक्रम रचला. त्या वेळी ऑलिम्पिक समितीनेही आश्चर्य व्यक्त केले होते. दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये त्यांनी पाच सुवर्णासह ९ पदके पटकावली होती.
उसेन बोल्ट
आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम जलद धावपटू, अशी उसेन बोल्टची ओळख आहे. १०० मी. शर्यतीमध्ये २००९ सालच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये बोल्टने विश्वविक्रम रचला होता. २००८ साली झाली बीजिंग आणि २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये बोल्टने प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकली होती. त्यामुळे आता रिओमध्ये साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत.
जेसी ओव्हेन्स
मैदानी शर्यतीमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे अमेरिकेचे जेसी ओव्हेन्स. फक्त ४५ मिनिटांमध्ये त्यांनी तीन विश्वविक्रम रचले होते. १९३६ साली बर्लिनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी चार सुवर्णपदकांची कमाई करीत देशाला अव्वल स्थानावर पोहोचवले होते. लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात ‘व्हिडीओ स्क्रीन’वरील त्यांची गतकामगिरी पाहून सारेच भारावले होते.
– प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com