जिनिव्हा : पॅरिस ऑलिम्पिकमधील ‘ट्रॅक अॅण्ड फिल्ड’ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्यास रोख ५० हजार डॉलरचे पारितोषिक देण्याच्या जागतिक अॅथलेटिक्स संघटनेच्या निर्णयास अन्य देशांच्या ऑलिम्पिक संघटनांकडून विरोध होत आहे. जागतिक अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी गेल्याच आठवडयात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) कधीच रोख पारितोषिक देत नाही. खेळाडूंना त्यांच्या देश आणि राज्याकडून रोख पारितोषिके दिली जातात. अर्थात, असा निर्णय प्रत्येक देश किंवा राज्य घेत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे को म्हणाले होते.
हेही वाचा >>> IPL 2024: राहुल-क्विंटन चेन्नईला पडले भारी, लखनौचा दणदणीत विजय
जागतिक अॅथलेटिक्स संघटनेच्या या निर्णयाला विरोध वाढत आहे. हा निर्णय ऑलिम्पिक चळवळ आणि तत्त्वांना मुरड घालणारा आहे, असे उन्हाळी ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय महासंघाने (एएसओआयएफ) म्हटले आहे. ‘आयओसी’चे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाख यांचा १२ वर्षांचा कालावधी पुढील वर्षी संपत आहे. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सेबॅस्टियन को यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळेच त्यांनी ही घोषणा केली असा मतप्रवाह आहे. आता को यांना रोखण्यासाठी ऑलिम्पिक चळवळीत बदल करून वयाची अट शिथिल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खेळाडूंमुळे ऑलिम्पिकला इतके महत्त्व प्राप्त होते. त्यांच्यामुळेच स्पर्धा यशस्वी आणि लोकप्रिय होत असते. त्यामुळे ‘आयओसी’कडून जागतिक अॅथलेटिक्सला मिळणाऱ्या महसुलामधूनच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत, असे को यांनी म्हटले आहे. मात्र, ‘एएसओआयएफ’ने या विचाराने ऑलिम्पिकची परंपरा मोडीत निघण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘आयओसी’कडून मिळणारा निधी हा खेळाच्या विकास आणि प्रसारासाठीच वापरण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे.