भारतीय तिरंदाजी संघटनेवर सरकारने घातलेल्या बंदीविरोधात भारतीय तिरंदाजांनी एकत्र येत दाद मागण्याचे ठरवले आहे. तिरंदाजीचा नवीन हंगाम काही महिन्यांतच सुरू होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर खेळाडूंच्या संघटनेच्या माध्यमातून दाद मागण्याची योजना तयार करण्यात येत आहे.
भारतीय तिरंदाजी संघटनेच्या निवडणुकांमध्ये वय आणि पदावरील कालावधी या नियमांची पायमल्ली झाली आहे. क्रीडा नियमावलीनुसार निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सरकारने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी आणली होती.
मार्च महिन्यात बँकॉक येथे होणार असलेली आशियाई ग्रां.प्रि.च्यानिमित्ताने हंगामाची सुरुवात होणार आहे. परंतु भारतीय संघाचे स्वरूप काय असेल याबाबत भारतीय तिरंदाजांना काहीच कल्पना नाही. साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित शिबीरही रद्द करण्यात आले आहे.
वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी हा निवडीसाठी निकष असेल असे आम्हाला सांगण्यात आले आहे. परंतु नुकत्याच झालेल्या या स्पर्धेनंतर पुढे काय याबाबत आम्हाला काहीही कल्पना नाही. आम्हाला अद्याप प्रशिक्षक नाही. वैयक्तिक पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोलकाता येथील साईच्या केंद्रात आम्ही सराव करतो, असे उद्गार आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता तिरंदाज मंगलसिंग चंपियाने काढले.
तिरंदाजांच्या संघटनेच्या परिघामध्ये साधारण २०० तिरंदाजांचा समावेश आहे. या सर्वाच्या निवेदनाचा विचार होईल अशी आशा असल्याचेही त्याने पुढे सांगितले.
आम्हाला तिरंदाजी संघटनेच्या विरुद्ध जायचे नाही. देशासाठी पदक जिंकणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तिरंदाजांच्या संघटनेमार्फत केल्या जाणाऱ्या निवेदनाचा गांभीर्याने विचार होईल अशी आशा तिरंदाजांच्या संघटनेचा उपाध्यक्ष तरुणदीप रायने व्यक्त केली. परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती आणि नवोदित खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी विशिष्ट कार्यक्रमाची गरज या मागण्याही प्रलंबित असल्याचे तरुणदीपने पुढे सांगितले.