16 मार्च ही तारीख भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी खूप खास आहे. आजच्या दिवशी 2012मध्ये सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय शतकांचे शतक साजरे केले होते. मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध रंगलेल्या सामन्यात सचिनने 114 धावांची धमाकेदार खेळी केली होती. सचिनचा शतकांच्या शतकाचा विक्रम आजही अबाधित असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू म्हणून सचिनची ख्याती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

12 मार्च 2011रोजी विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले 99वे शतक केले होते. त्यानंतर एक वर्ष चार दिवस सचिन 99 धावांवरच अडकून पडला होता. यादरम्यान भारताने इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. शिवाय, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेचाही हिस्सा होती. मात्र, सचिनला शतक करता आले नव्हते. यादरम्यान त्याने 34 डाव खेळले. शेवटी, बांगलादेशच्या मुशरफी मुर्तझाच्या चेंडूवर फटका खेळत सचिनची मोठ्या विक्रमाची प्रतीक्षा संपली.

सचिनची खेळी –
या खेळीत सचिनने चांगली सुरुवात केली. मात्र, त्याचा शतकापर्यंतचा प्रवास मंदावत गेला. अखेरीस, 138व्या चेंडूवर त्याने आपले शतक पूर्ण केले. सचिने नवा विक्रम रचला खरा मात्र, या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने 50 षटकांत 289 धावा केल्या होत्या. पण बांगलादेशने 4 चेंडू बाकी ठेवून हा सामना जिंकला.

सचिनची कारकीर्द –
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34,347 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 18,426 धावा तर कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. सचिनने कसोटीत 51 शतके आणि वनडेमध्ये 49 शतके ठोकली आहेत. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 11 आणि कसोटी सामन्यात 8 शतके ठोकली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On this day sachin tendulkar scored his 100th international hundred
First published on: 16-03-2021 at 11:18 IST