भारतात क्रिकेट हा निव्वळ खेळ नसून एक धर्म आहे आणि त्याचा देव आहे सचिन तेंडुलकर. तर, अशा या क्रिकेटप्रेमी देशातील जनतेला आपल्या या आवडीच्या खेळाबाबत किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी http://www.criciq.com/ ऑनलाइन क्रिकेट प्रश्नमंजुषाची अनोखी बेवसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे. ‘इएसपीएन स्पोर्ट्स मीडिया’च्या या वेबसाईटवर क्रिकेटशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले असून, उत्तरादाखल काही पर्यायदेखील दिलेले आहेत. या वेबसाईटची सुरुवातच ‘क्रिकेट हा तुमचा धर्म आहे का?’ या प्रश्नाने होते. क्रिकेटवरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा खेळण्यासाठी तुम्ही फेसबूक, टि्वटर, गुगलप्लस अथवा इएसपीएन क्रिकइन्फोच्या लॉगिन आयडीद्वारे लॉगिन करू शकता. लॉगिन केल्यावर तुमचे स्वागत करणारे स्क्रिन अवतरते, येथील प्ले बटणावर क्लिक करताच तुम्हाला खेळाविषयीची माहिती पुरवली जाते. ज्यात स्कोर, बेस्ट स्कोर, लाईफलाईन – ५०/५० पर्याय, स्निक पीक आणि स्विच हीट आणि टायमर इत्यादी बाबत माहिती देण्यात आली आहे. ही विन्डो बंद करताच क्रिकेटवरील प्रश्नमंजुषेच्या खेळाला सुरुवात होते. एका प्रश्नासाठी चार पर्याय असे याचे स्वरूप आहे. योग्य पर्याय निवडल्यास तुमच्या खात्यात गुण जमा होतात. चुकीचे उत्तर दिल्यास तो प्रश्न बाद धरला जातो. एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे ६० सेकंदाचा वेळ असतो. एकूण १५ प्रश्न असणाऱ्या या खेळात १०व्या प्रश्नानंतर प्रश्न थोडे कठीण होत जातात. उत्तर माहिती नसल्यास तुम्ही लाईफलाईनचा वापर करू शकता. दिवसभरात तुम्ही तीन वेळेस खेळू शकता. याशिवाय फेसबुक आणि गुगल प्लसवरील तुमच्या मित्रांना ही प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी आव्हान देऊ शकता. बेस्ट स्कोर आणि पारितोषिकाबाबतची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.