scorecardresearch

कश्यपचा सनसनाटी विजय

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पारुपल्ली कश्यपला कामगिरीत सातत्य राखता आले नव्हते. मात्र इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत कश्यपने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चेन लाँगला नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली.

कश्यपचा सनसनाटी विजय

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पारुपल्ली कश्यपला कामगिरीत सातत्य राखता आले नव्हते. मात्र इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत कश्यपने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चेन लाँगला नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. या विजयासह कश्यपने उपांत्य फेरीत आगेकूच केली. ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना नेहवालला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
जागतिक क्रमवारीत अव्वल दहामधून घसरण झालेल्या कश्यपने एक तास आणि तीन मिनिटे रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत अव्वल मानांकित चेन लाँगवर १४-२१, २१-१७, २१-१४ अशी मात केली. उपांत्य फेरीत त्याचा मुकाबला तृतीय मानांकित डेन्मार्कच्या जॅन ओ जॉर्गेससनशी होणार आहे. तडाखेबंद स्मॅशचे फटके आणि नेटजवळून केलेला सुरेख खेळ कश्यपच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. या सामन्यापूर्वी चेनची कश्यपविरुद्धची कामगिरी ७-१ अशी होती. योगायोगाने कश्यपने २०१२ मध्ये याच स्पर्धेत चेनवर मात केली होती. सर्वागीण वावरासह जबरदस्त पदलालित्य ही चेनच्या खेळाची ओळख आहे. मात्र कश्यपने स्मॅशच्या फटक्यांचा प्रभावीपणे उपयोग करत चेनला निष्प्रभ केले.
पहिल्या गेममध्ये कश्यपने ६-२ अशी आघाडी घेतली, मात्र चेनने ११-११ अशी बरोबरी केली. विश्रांतीनंतर चेनने नेहमीच्या आक्रमक पवित्र्यासह खेळ करत सातत्याने गुण मिळवले आणि पहिला गेम नावावर केला.
दुसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. ७-७ अशा बरोबरीतून कश्यपने हळूहळू आघाडी मिळवली. चेनने प्रत्येकवेळी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला मात्र कश्यपने सरशी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये कश्यपने ९-३ अशी भक्कम आघाडी घेतली. चेनच्या हातून झालेल्या भरपूर चुकांचा कश्यपने फायदा उठवला आणि तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
महिलांच्या लढतीत पाचव्या मानांकित सिझियान वांगने सायनावर १६-२१, २१-१२, २१-१८ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये सायनाने ११-५ अशी आघाडी मिळवली. ही आघाडी सातत्याने वाढवत सायनाने पहिला गेम जिंकला. अनुभवी वांगने सारा अनुभव पणाला लावत दुसऱ्या गेममध्ये झंझावाती खेळ करत सायनाला कोणताही संधी दिली नाही. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने ६-३ अशी निसटती आघाडी घेतली. मात्र वांगने चिवटपणे खेळ करत ६-६ अशी बरोबरी केली. चुरशीच्या मुकाबल्यात सायनाने १५-१० अशी आघाडी घेतली. वांगने जिद्दीने खेळ करत १५-१५ अशी बरोबरी केली. यानंतर व्यावसायिक पद्धतीने खेळ करत वांगने बाजी मारली.
मोठा विजय! उपांत्य फेरीचा मार्ग सुकर. असाच पाठिंबा देत राहा!
– पी. कश्यप

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2015 at 08:07 IST

संबंधित बातम्या