बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे डावपेच

‘‘समाजमाध्यमांद्वारे असंख्य चाहत्यांशी मी जोडलेली आहे. देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या चाहत्यांचा पाठिंबा आणि प्रेम मिळत असते. ते कायमच महत्त्वाचे असेल. परंतु चांगल्याबरोबर विचारात व्यत्यय आणणाऱ्या आणि खेळापासून दूर नेणाऱ्या गोष्टीही तिथे असतात. त्यामुळे ऑलिम्पिक संपेपर्यंत समाजमाध्यमांवर कमीत कमी वावर असेल,’’ असे युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सांगितले. रिओ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर हैदराबाद येथील गोपीचंद अकादमीत सिंधूचा सराव सुरू झाला आहे. त्या वेळी ती बोलत होती.

‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन पदकांमुळे अपेक्षा वाढल्या आहेत. क्रीडा विश्वातली सर्वोच्च स्पर्धा अर्थात ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर पदक मिळवण्याचा माझा निर्धार आहे. पण केवळ ऑलिम्पिक आणि पदक असा अट्टहास नाही. उंचीमुळे मला खाली वाकून फटका खेळायला भाग पाडण्याचे डावपेच दिसून आले आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सराव सुरू आहे. कोणत्याही खेळाडूविरुद्ध गाफील राहून चालणार नाही. सातत्याने डावपेच बदलण्याची आवश्यकता आहे. सामन्यात एखाद्या क्षणी आघाडीवर असले तरी हुरळून जाणे परवडणारे नाही. एकेक गुण मोलाचा आहे. सामन्यादरम्यान एका टप्प्यात अफलातून कामगिरी, मात्र काही क्षणांतच अत्यंत खराब कामगिरी होते. प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि मी यासंदर्भात काम करत असून हे ध्रुवीकरण टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे,’’ असे सिंधूने सांगितले.

पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकवारीविषयी सिंधू म्हणाली, ‘‘मी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. जगभरातल्या सर्वोत्तम क्रीडापटूंसह वावरण्याची संधी अनोखी असेल. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओवारीसाठी निवड झालेल्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तो क्षण अविस्मरणीय होता.’’

‘‘दुखापतींनी मला चांगलेच हैराण केले होते. दुखापतींच्या ससेमिऱ्यात अडकल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामधून माझी घसरण झाली. प्रशिक्षक, फिजिओ यांच्या प्रयत्नांमुळे आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. विविध स्पर्धाच्या निमित्ताने अनेक देशांत जाणे होते, पण अद्याप कधीही ब्राझीलला भेट दिलेली नाही. सर्वस्वी नव्या अशा वातावरणात खेळण्याचे आव्हान असेल. रिओबाबत अनेक गोष्टी कानावर येत आहेत, मात्र बाह्य़ वातावरणाने फारसा फरक पडत नाही. दररोज सहा ते सात तास बॅडमिंटनचा सराव आणि तासभर अन्य व्यायाम असे भरगच्च वेळापत्रक आहे.  क्रीडा विश्वातील सर्वोच्च स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची मिळणारी संधी आनंद आणि समाधान देणारी आहे,’’ असे सिंधूने सांगितले.

‘‘कालच (मंगळवारी) माझा वाढदिवस झाला. मात्र दिवसभर सरावात व्यस्त होते. वाढदिवस खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकनंतरच साजरा करेन,’’ असा ठाम विश्वास व्यक्त करत सिंधू पुन्हा सरावासाठी रवाना झाली.