T20 World Cup Semifinal: ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन करतोय पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना; म्हणाला, “इंशाअल्लाह…”

दोन्ही संघांत आतापर्यंत २३ टी-२० सामने झाले असून, यापैकी १३ सामने पाकिस्तानने आणि ९ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.

PAK vs AUS T20 WC
आज होणार उपांत्यफेरीमधील दुसरा सामना

इंशाअल्लाह पाकिस्तान जिंकेल… हे शब्द आहेत मॅथ्यू हेडनचे. हेडनने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्याआधी हे वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे स्वत: ऑस्ट्रेलियन असणाऱ्या हेडनने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या या सामन्याआधी तो प्रशिक्षण देत असणाऱ्या संघाच्या बाजूने भाष्य केलं आहे. आपल्याच देशाच्या संघाला पराभूत करण्यासाठी हेडनने प्रशिक्षक म्हणून कंबर कसली आहे. हेडन सध्या पाकिस्तानी संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत असून तो संघासोबत असल्यापासून संघाच्या फलंदाजीमध्ये कामालीची सुधारणा झाल्याचं पहायला मिळत आहे.

“सध्या मनात फारच विचित्र भावना आहेत. मी दोन दशकांहून अधिक काळ ऑस्ट्रेलियन संघासाठी क्रिकेट खेळलोय. त्यामुळे मला केवळ या खेळाडूंबद्दलच नाही तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्कृतीबद्दलही सविस्तर कल्पना आहे,” असं हेडनने सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> …अन् सारा संघ विजयाचा जल्लोष करताना सामना जिंकवून देणारे मात्र खुर्च्यांवरुन हललेही नाहीत; फोटो होतोय व्हायरल

पाकिस्तानी क्रिकेटसाठी टी-२० विश्वचषक जिंकणं हे फार महत्वाचं ठरणार असल्याचं हेडन म्हणतो. मागील बऱ्याच काळापासून सुरक्षेच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या पाकिस्तानला हा विजय आशादायक ठरेल असं हेडनचं म्हणणं आहे. “पाकिस्तानसाठी ही फार महत्वाची स्पर्धा आहे. आमच्याकडे सध्या खेळाडूंचा असा संघ आहे तो मैदानामध्ये उतरुन जिंकण्यासाठी सर्व प्रकार प्रयत्न करण्यास तयार आहे. केवळ उपांत्य फेरीच नाही तर इंशाअल्लाह आम्ही पुढेही अशाच प्रकारे जाऊ आणि अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवू,” असं हेडनने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “बाबरबद्दल मी असं म्हणालोच नव्हतो, मी फक्त…”, पाकिस्तानी चाहत्यांनी व्हायरल केलेल्या Fake Tweet वर हर्षा भोगलेंचा भन्नाट रिप्लाय

२०१६ मध्ये टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत गारद होण्याची नामुष्की ओढवलेल्या पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीमधील अनुकूल वातावरणात २००९च्या जेतेपदाची पुनरावृत्ती करण्याचा चंग बांधला आहे. यंदाच्या स्पर्धेत अपराजित राहणारा पाकिस्तान हा एकमेव संघ आहे. २०१० च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने माइक हसीच्या कामगिरीच्या बळावर पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता.

पाकिस्तानने भारतावर ऐतिहासिक विजयासह रूबाबात टी-२० विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ केला. त्यानंतर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानवरही शानदार विजय मिळवले. त्यामुळे ‘अव्वल-१२’ फेरीतून गटविजेते म्हणून ते उपांत्य फेरीत पोहोचले. ऑस्ट्रेलियाने परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून हार पत्करली, परंतु दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला हरवून गटात उपविजेते म्हणून आगेकूच केली. २०१० मध्ये उपविजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेन्टी-२० जेतेपदासाठी आसुसला आहे.

नक्की वाचा >> २०१७ मध्येच क्रिकेट सोडण्याच्या विचारात असणारा खेळाडूच आज न्यूझीलंडला T20 World Cup फायनलमध्ये घेऊन गेला

आमने-सामने आकडेवारी काय सांगते?
उभय संघांत आतापर्यंत २३ टी-२० सामने झाले असून, यापैकी १३ सामने पाकिस्तानने आणि ९ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. (एक सामना अनिकाली)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pak vs aus t20 world cup 2021 semifinal matthew hayden wish pakistan will win and qualify for finals scsg