Pakistan All Out Against UAE: आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेची तयारी म्हणून पाकिस्तानचा संघ यूएई आणि अफगाणिस्तानविरूद्ध तिरंगी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ३९ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा दुसरा सामना यूएईविरूद्ध पार पडला. या सामन्यात यूएईच्या गोलंदाजी आक्रमणासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत २०० धावांचा पल्ला गाठला, पण १० विकेट्स देखील गमावल्या.
या सामन्याचा थरार शारजाहच्या मैदानावर पार पडला. आगामी आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन यूएईत केले जाणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला या डावात हवी तशी सुरूवात करता आली नाही.
अवघ्या ९ धावांवर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज तंबूत परतला. त्यानंतर फखर जमान देखील अवघ्या ६ धावसंख्येवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर सॅम अयुबने यूएईच्या गोलंदाजांची धुलाई करत ६९ धावांची खेळी केली. तर हसन नवाजने ५६ धावांची खेळी केली. या दोघांनी अर्धशतकं झळकावली. तर पाकिस्तानच्या ७ फलंदाजांना खातंही उघडता आलेलं नाही. या सामन्यात पाकिस्तानने २०० धावांचा पल्ला गाठला, पण संघाचा संपूर्ण डाव आटोपला.
पाकिस्तानचा संघ यूएईविरूद्ध आपला दुसराच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. दुसऱ्याच सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण डाव आटोपला. यूएईचा संघ आयसीसीच्या रँकिंगमध्ये १५ व्या स्थानी आहे. आशिया चषक तोडांवर असताना यूएईकडून ऑलआऊट होणं, यावरून पाकिस्तानचा संघ किती तयार आहे हे दिसून येतंय. हारिस रौफने भारतीय संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत करू असं म्हटलं होतं. पण यूएईसारख्या कमी अनुभवी गोलंदाजाविरूद्ध ऑलआऊट होणारा संघ बलाढ्य भारतीय संघाला कसं आव्हान देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबरला रंगणार आहे.